Take a fresh look at your lifestyle.

नितीन गडकरी भारताचे पुढचे पंतप्रधान होवू शकतात ?

0

जेव्हा भाजप मध्ये एक गट मोदींना पंतप्रधान उमेदवार म्हणून पुढे करा अस म्हणत होता. त्यावेळी ह्या मता विरूद्ध असणारा मतप्रवाह होता. मोदी त्यावेळी पंतप्रधान उमेदवार होऊ शकले नाहीत. अडवाणींना त्यावेळी भाजपने पुढे केले होते. ती निवडणूक काँग्रेसने जिंकली आणि मनमोहन सिंह पंतप्रधान झाले.

मला आठवते Times of India मध्ये एक लेख आला होता. त्या लेखाचं शीर्षक होत caught in Modi’s web.

या लेखाचा सारांश असा: जरी मोदी आत्ता पंतप्रधान उमेदवार होऊ शकले नसले तरी त्यांची ऑनलाईन तयारी पाहता ते खूप पुढे आहेत. फेसबूक ट्विटर आणि सगळ्या सोशल मीडिया पोर्टल वर ते खूप पुढे आहेत. त्यांच्या इतकी भविष्याची तयारी इतर कोणी नेत्याने केलेली दिसत नाही.त्याचे झालेही तसेच मग आपल्याला माहितीच आहे की नरेंद्र मोदी यांनी नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

राजकारणात महत्वाकांक्षेला काहीच मर्यादा नसते. म्हणजे सामान्य घरातील एक व्यक्ती नरेंद्र मोदी यांना कदाचित ते कधी एका राज्याचे मुख्यमंत्री होतील असेही वाटले नसावे, पण आज ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत पंतप्रधान आहेत.

अनादी काळापासून शरद पवार हे कायम संभाव्य पंतप्रधानाच्या यादीतच राहिले आहेत. पण शरद पवार यांनाही कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ते आज ज्या काही पदावर पोहोचले आहेत तेसुद्धा विशेषच आहे.

नितीन गडकरी यांना संघाचा पाठींबा आहे. ही त्यांच्यासाठी भक्कम अशी जमेची बाजू आहे. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांचा, पाठींबा एका मराठी माणसाला मिळेल का ? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यावेळी शरद पवार यांचे नाव चर्चिले जात होते, तेव्हासुद्धा उत्तरेकडील राज्यांचा त्यांना पाठींबा मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणूनच ते स्पर्धेतून बाजूला झाले.

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. हे नेहमी आपण नितीन गडकरी यांच्याच तोंडातून हे वाक्य ऐकलं असेल.

गडकरी हे तसे असाधारण राजकारणी आहेत. त्यांच्या  जोडीला टापटीप राहणी, जीवनाचा आनंद समरसून घेण्याची वृत्ती, यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे पडतात. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमांत बोलण्याचा आनंदही ते मनमुराद लुटतात. कोणाचीही तमा न बाळगता त्यांचं बोलणं ‘मुक्त’ असतं.

केंद्रात मंत्री झाल्यापासून गडकरी यांच्या कामाची नेहमीच चर्चा होत आली आहे.

महामार्ग, रस्ते वाहतूक, जलसंपत्ती, नदीविकास व गंगा शुद्धीकरण ही खाती त्यांच्याकडे आहेत. मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अगदी यशस्वी राहिलेली आहे. गडकरी जिथं हाथ घालतात, तिथं यश मिळतं, असं त्यांच्या कार्यशैलीवरून दिसून येतं. महामार्ग बांधणीत त्यांचं काम चांगलं आहे. गंगा शुद्धीकरण, जलसंपत्ती विकास यात त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत आहे. पाटबंधारे प्रकल्पांतही कामं होत आहेत.

२०१९ मध्ये सत्तेत आलेले भाजप – २ च्या मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक व महामार्ग; आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे खाते देण्यात आले आहे. यात रस्ते वाहतूक व महामार्ग हे खाते नेहमीच त्यांच्या आवडीचे राहिले असून या क्षेत्रात त्यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे.

आज देशात अनेक महामार्गांचे काम जोरात चालू असून भारताबाहेरील काही कामांची अतिरिक्त जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मला खोटे बोलता येत नाही. ओठात एक आणि पोटात एक असा माझा स्वभाव नाही. जे मनात असेल ते थेट बोलतो.असा नेहमी बेधडक बोलत  नितीन गडकरी यांनी आतापर्यंत जवळजवळ ४० वर्षे राजकारणात घालवली आहेत आणि या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या ज्यांमुळे लोकांमध्ये एक प्रसिद्ध राजकारणी निर्माण झाला आहे.

सकारात्मक उर्जेचे व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेउन कार्य करण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ते नेहमी वरिष्ठांच्या मर्जीतले ठरले आहे. नितीन गडकरी यांनी पक्षसंघटनेत प्रदेशाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केलेले काम अफाट आहे. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाला तर तोडच नाही. ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज देश-विदेशातही ते लोकप्रिय आहेत. परंतु, माणूस म्हणूनही त्यांची लोकप्रियता त्याहीपेक्षा मोठी आहे.

आज घडीला भाजपा मधूनच नितीन गडकरी यांना नरेंद मोदी यांना पर्याय म्हणून पहिले जात आहे असे दिसते .राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी यांच्यामागे आपली ताकद उभी करू शकते, आणि जेव्हा जेव्हा भाजप बॅकफूट ला गेली आहे तेव्हा तेव्हा फक्त नितीन गडकरी हे सगळ्या चॅनेल्स आणि मीडिया मध्ये बोलायला उभे राहिले आहेत.

त्यांनी नेहमी सक्षमपणे भाजपला तारलंय. या लेखात वरती मी ज्या लेखाचा उल्लेख केला होता तसाच लेख आज अनेक वर्तमान पत्रांनी नितीन गडकरी यांच्यावर देखील लिहला आहे . त्यावेळी जसे मोदींना टेकसॅव्ही म्हणून ओळखलं जात त्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त नितीन गडकरी आज टेकसॅव्ही आहेत. अस अनेक लोकांच मत आहे.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात. ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत, स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय समर्थकांना ते आवडतात. २०२४ ला जर स्वतःच्या बळावर भाजप  बहुमत गाठू शकली नाही. तर NDA मधील घटक पक्ष मोदींना नक्कीच विरोध करतील.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ठ बहुमत न मिळाल्यात मित्र पक्षाकडून नितीन गडकरी यांच्या नावाची मागणी होवू शकते. नितीन गडकरी यांचा मंत्रीपदाचा कार्यकाल एक सक्षम मंत्री म्हणून राहिलेला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात  नितीन गडकरी नक्कीच भारताचे पुढचे पंतप्रधान होवू शकतात त्यात नवल वाटायला नको.

– सत्यम जोशी

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.