राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे
डॉ. माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आल्याने ईशान्येकडील राज्यात भाजपचे चौथे मुख्यमंत्री हे मुळचे काँग्रेस पक्षाचे असतील.
त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून डॉ. साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
त्रिपुरा भाजपच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या बैठकीला भाजपच्या केंद्रीय समितीकडून भूपेंद्र यादव हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसंच, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही उपस्थित होते.
कोण आहेत माणिक साहा?
डॉ.माणिक साहा हे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यामागचे कारण त्यांची निष्कलंक प्रतिमा आणि पक्षातील त्यांचा वाढता प्रभाव हे आहे.
माणिक साहा हे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. व्यावसायिक डॉक्टरांसोबतच त्यांची प्रतिमा एक प्रामाणिक नेता अशीही आहे. राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे.
माणिक साहा हे त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये त्रिपुरामध्ये पक्षाच्या विजयात माणिक यांचा मोलाचा वाटा होता. त्याचवेळी बिप्लब देब यांच्या विरोधात पक्षात काही प्रमाणात असंतोष होता. त्यामुळे भाजपला त्यांचा चेहरा घेऊन पुढच्या निवडणुकीत जायचे नव्हते, असेही बोलले जात आहे.
काँग्रेसमधून आलेला भाजपचा चौथा मुख्यमंत्री
त्रिपूरा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले डॉ. माणिक साहा हे मूळचे काँग्रेसचे. २०१६ मध्ये डॉ. साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ. साहा यांच्या नियुक्तीमुळे ईशान्येकडील राज्यात मूळचे काँग्रेसी चौथे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून विराजामान होत आहेत.
डॉ. माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आल्याने ईशान्येकडील राज्यात भाजपचे चौथे मुख्यमंत्री हे मुळचे काँग्रेस पक्षाचे असतील.
आसामचे हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे प्रेम खांडू, मणिपूरचे एन. बिरेन सिंह हे ईशान्येतील तीन राज्यांचे मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात
साहा यांना प्रदेशाध्यक्ष बनवून पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली. परिसराचे राजकारण अगदी जवळून समजून घेण्यात माहीर असलेल्या माणिक यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत थेट संवाद साधण्यावर भर दिला होता. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत साहांच्या शपथविधीमुळे त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात, असे मानले जात आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम