अण्णाभाऊ म्हणाले “तर नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल”
सांगलीतील एका गावातून थेट मुंबई आणि त्यानंतर आपल्या लेखणीच्या जोरावर अण्णाभाऊंनी परदेशातही स्वतःच्या नावाचा लौकिक केला. अण्णाभाऊचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानश्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ साठे तर आईचे नाव वालूबाई होते. लहानपणी तत्कालीन जातीय उतरंडीची झळ बसल्याने शिक्षणाची आस असूनही त्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षण प्राप्त होऊ शकले नाही.
अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम साठे पण पुढे आपल्या सार्वजनिक कार्यामुळे ते समस्त समाजाचे ‘अण्णा’ झाले.
पिक्चरमधून अक्षरज्ञान
१९३२ साली अण्णाभाऊ आपल्या वडिलांसोबत मुंबईला आले. चरितार्थासाठी त्यांनी कोळसे वेचले. मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी केली. असे पडेल ते काम करत अण्णाभाऊंचे बालपण सरले. मुंबईत वास्तव्यास असताना कामगारांचे कष्टमय जीवन त्यांनी जवळून अनुभवले.
या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद जडला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.
अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. परंतु, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अण्णाभाऊंच्या अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले.
कॉ. डांगे यांच्या प्रभावाने चळवळीत
रेठरे येथील जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाने अण्णाभाऊ साठे यांच्यात स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटले. पुढे १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते झाले.
१९४२ च्या स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला असताना ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले.
ब्रिटिशांना शरण न जाता अण्णाभाऊंनी थेट मुंबई गाठली. इथेच त्यांच्या जीवनास खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव ‘लोकशाहीर’ म्हणून गाजू लागले
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी शाहिरी
अण्णाभाऊंनी लिहलेली “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली” ही लावणी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली. जो मराठी भाषकांचा भाग महाराष्ट्रात आला नाही, त्याबद्दलची वेदना या कवनातून त्यांनी व्यक्त केली. अण्णा जिथे असतील तिथे हजारोंच्या संख्येने लोक जमत. जनतेत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम अण्णा भाऊंनी केले.
याचा फायदा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले. त्यांच्या पोवाड्यांनी मराठी अस्मिता जागृत करण्याचे काम केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सेनानी स्व. एस्. एम्. जोशी हे एका चर्चेत म्हणाले होते.’अण्णा भाऊ, अमर शेख व गव्हाणकर हे शाहीर नसते आणि विशेषतः अण्णा भाऊ यांची भेदक शाहिरी नसती, तर कदाचित महाराष्ट्र राज्याची निर्मिती काही दिवस पुढे गेली असती.” महाराष्ट्र राज्य निर्मितीत अण्णा भाऊंचे किती मोठे योगदान आहे. हेच एस एम यांनी दाखवून दिले आहे.
नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल
वडील थकल्यामुळे वयाच्या १७-१८ व्या वर्षीच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली. त्यानंतर काही दिवसात ते मुंबईमधील माटुंग्यातील चिरागनगर येथे एका झोपडीत राहायला आले. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या लेखणीतून एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृती घडल्या.
ते म्हणायचे, ‘आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे’. अण्णाभाऊ साठे यांना लोकांनी एकदा विचारले, ”तुमच्या झोपडीचे दार एवढे लहान का?” यावर अण्णाभाऊ म्हणाले, ”पंडित नेहरू जरी माझ्या झोपडीत आले तरी त्यांना वाकूनच यावे लागेल ! ” ! ”
अण्णा भाऊंनी आयुष्यभर आपली लेखणी श्रमिक, कष्टकरी महिला आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी वापरली. त्या अण्णा भाऊंना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही. त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे, यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने तशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. लवकर त्याची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा !
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम