Take a fresh look at your lifestyle.

मुंबईमध्ये रेल्वे सुरु करण्यामध्ये नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा होता

0

इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही वाचले असेल, भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती. देशात तेव्हा ब्रिटीश शासन होते. पण १८५३ साली भारतात रेल्वे सुरु होण्यामागे एका मराठी माणसाचा मोठा सहभाग होता, ते म्हणजे नाना शंकरशेठ.

कोण होते नाना शंकरशेठ

1803 ते 1865 हा नानांचा जीवनकाळ. पेशवाईतील शहाणपण मानले गेलेले नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर तीनच वर्षांत नवसमाजरचनेचे शहाणपण मानल्या जाणाऱ्या नानांचा जन्म झाला व 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर आठ वर्षांनी नाना निर्वतले.

मुंबईच्या सार्वजनिक जीवनातील एकही क्षेत्र असे नव्हते, जिथे नानांनी आपल्या कल्पना चातुर्याचा व कार्याचा ठसा उमटवला नाही. मुंबईची रेल्वे, शिक्षण पद्धती, चाळी, स्मशाने, वाटनालये, टाउन हाॅल, अशा सर्वच क्षेत्रांतील विकास कार्यांवर नानांचा प्रभाव होता.

रेल्वे सुरु करण्याची प्रेरणा

१८३० साली इंग्लडमध्ये पहिल्यांदा लिव्हरपूल ते मँचेस्टर अशी रेल्वे सेवा सुरु झाली. याची माहिती जेव्हा नाना शंकरशेट यांच्यापर्यंत पोहचली. तेव्हापासून त्यांना सारखे वाटत असे की, हि रेल्वे आपल्या देशातही असणे गरजेचे आहे. त्यांनी तसा निश्चय केला कि आपल्या देशात रेल्वे आणायचीच.

नानांनी आपली संकल्पना ज्येष्ठ मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली. १८४०च्या सुरुवातीस इंग्लंडमधील रेल्वेच्या परिणामांचे फलित पाहिलेल्या सर थॉमस एरसकीन पेरी यांच्याशीही सल्लामसलत केली. देशात रेल्वे उभारणीबाबत तिघांचे एकमत झाले. तेव्हा आपल्या देशात इस्ट इंडिया कंपनीचे सरकार होते आणि कंपनी सरकारला यामध्ये मुळीच रस नव्हता. पण नानांनी ध्येयपूर्तीचा ध्यास घेतला होता.

आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी १८४३च्या सुमारास नानांनी आपले काही सहकारी, ब्रिटिश बँकर्स, व्यापारी व अधिकाऱ्यांसोबत ‘ग्रेट इंडियन रेल्वे’ नावाच्या कंपनीची स्थापना मुंबईत केली.

त्याच दरम्यान इंग्लंडमधून नुकतेच आलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सर थॉमस एरसकीन पेरी यांनी स्वतःहून भाग घेतल्यामुळे नानांना एकप्रकारे उत्तेजन मिळाले. १३ जुलै १८४४ रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला. तर रेल्वे सुरु करण्यासाठी ‘द इनलँड रेल्वे असोसिएशन’ स्थापन करण्यात आले. मुंबईपासून कुठपर्यंत रेल्वे लाइन टाकता येऊ शकते, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सुरुवातीला रेल्वेच्या मार्ग ठरविण्यासाठी जी. टी. क्लार्क नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कुर्ला ते ठाणे या रेल्वे मार्गाचा तांत्रिक प्लॅन बनविला व त्याला ‘द बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे’, असे नावही दिले. सायन येथील मिठागरे आणि खारफुटीला हानी न पोहचवता भारतीय रेल्वेची आखणी केली. त्यात अप आणि डाऊन अशा दोन लाइन्स व ताशी १० मैल वेगाच्या दररोज दोन ट्रेन्सचे आयोजन केले.

भारतात नाना शंकरशेठ यांनी रेल्वे सुरु करण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांची माहिती जेव्हा लंडनमध्ये पोहचली तेव्हा लंडनमध्ये काही उद्योजकांनी लॉर्ड जे. स्टुअर्ट वॉर्ली यांच्या नेतृत्वाखाली ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेची स्थापना केली. त्याच कंपनीची मुंबईत नवीन शाखा उघडली. ग्रेट इंडियन पेनिनसुलर कंपनीने प्रतिनिधी म्हणून लंडनवरून जॉन चापमन यांना मुंबईत पाठविले. मुंबईत आल्यावर जॉन चापमन यांनी नाना शंकरशेट यांची भेट घेतली. नानांकडून सर्व माहिती घेतल्यावर त्यांनी लंडन आणि मुंबईमधील लोकांना एकाच छत्राखाली आणावे असा विचार केला. नानांनीही त्यास होकार दिला.

एकंदरीत लंडन व मुंबईमध्ये भारतीय रेल्वे सुरु करण्याचे चाललेले प्रयत्न पाहून कंपनी सरकारने जुलै १८४८ मध्ये मुंबई ते कल्याण हा ३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकण्याची परवानगी दिली. त्यानुसार ग्रेट इंडियन पेनिनसुलर कंपनी लगेचच कामाला लागली. फेब्रुवारी १८५० मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी इंजिनीअर्स व इतर स्टाफचे इंग्लंडहून मुंबईत आगमन झाले. त्यांच्या ऑफिससाठी नानांनी गिरगावातील शंकरवाडीतील स्वतःच्या बंगल्याच्या आवारात जागा दिली आणि सुरुवातीस मुंबई ते ठाणे हा २१ मैलांचे काम सुरु करण्यात आले.

त्याकाळी मुंबई हे राजधानीचे शहर नव्हते तरी देखील केवळ नाना शंकरशेट यांच्या प्रभावामुळे देशातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली वहिली रेल्वे सुरू करण्याचा मान मुंबईला मिळाला.

वर्षभरात गिरगावातील शंकरवाडीतील कार्यालयात नियोजन, सर्वेक्षण, रेल्वे रुळ आणि इतर कामे नानांच्या सल्ल्यानुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी सायन येथे ठाण्यापर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. इंजिनीअर जेम्स प्रोवेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २१ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्याचे अवाढव्य काम लीलया पेलले.

१८ फेब्रुवारी १८५२ रोजी पहिल्या ट्रायल रनसाठी कंत्राटदाराने लोकोमोटिव्ह इंजिन सुरू केले. अखेर मुंबई आणि देशातील जनतेसाठी शनिवार, १६ एप्रिल १८५३ हा अविस्मरणीय दिवस उगवला. ठीक ३.३० वाजता बोरिबंदरहून ठाण्यासाठी देशाचीच नव्हे, तर आशिया खंडाची पहिली ट्रेन धावली. या ट्रेनला १८ कंपार्टमेंट आणि तीन लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. खास करून फुलांनी शृंगारलेल्या कंपार्टमेंटमध्ये लेडी फोल्कलंड समवेत नाना शंकरशेट व जमशेटजी जिंजीभोय होते.

नाना शंकरशेट यांनी घेतलेल्या परिश्रमास अभिवादन व त्याचा बहुमान करीत राणी एलिझाबेथने नानांना रेल्वेने कायम स्वरूपी प्रवास करण्यास सुवर्ण पास प्रदान केला होता.

आजघडीला रेल्वे हा मुंबईचा अविभाज्य घटक आहे. आज चकाकणाऱ्या मुंबईच्या प्रगतीमध्ये भारतीय रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. पण हीच रेल्वे मुंबईमध्ये सुरु करण्यासाठी नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा होता. नानांचे आयुष्य 62 वर्षांचे. त्यांची बहुविध क्षेत्रांतील भरीव व मौलिक कामगिरी पहाता इतक्या कमी वर्षांच्या हयातीत या एका व्यक्तीने शंभर संस्थांना झेपणार नाहीत, अशी आणि इतकी कामे करून दाखवावीत, हे वास्तव स्तीमित करणारे आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.