विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेशासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण केले होते
पंढरपूरचा विठ्ठल हा अनेकांचा गोरगरिबांचा देव मानला जातो, पण या विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात सलग दहा दिवस उपोषण केले होते.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी. साने गुरुजींना आपण एक लेखक म्हणून ओळखतोच. त्यांनी लिहलेले ‘श्यामची आई’ पुस्तक वाचल नसेल असा माणूस शोधून सापडणे दुर्मिळच. त्यांची हळवा मातृभक्त हि प्रतिमा महाराष्ट्राने आजवर जपली आहे.
साने गुरुजींच्या लेखक, विचारवंत, कवी, स्वातंत्र्यसैनिक या प्रतिमेसोबत त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याची आठवण देखील ठेवायला पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील अनेक मंदिरात दलितांना मंदिरप्रवेश नव्हता. त्यात पंढरपुरच्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मंदिराचा देखील समावेश होता.
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी राज्यभर जनजागृती केली आणि त्यानंतर पंढरपुरात उपोषण करण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात आज स्टेशन रोडवर असलेल्या संत तनपुरे महाराज मठात हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
साने गुरूजींनी विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दलितांना प्रवेशासाठी दि. १ ते १० मे १९४६ साली सलग १० दिवस उपोषण केले.
गुरुजींच्या या उपोषणाला सनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. पण जनतेमधून मात्र चांगला पाठिंबा मिळाला. उपोषणाच्या सहाव्या दिवशी जेष्ठ साहित्यिक, राजकारणी असलेल्या प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी गुरुजींची भेट घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने उपोषणाला पाठिंबा देत साने गुरूजींचे काही कमीजास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार असे सांगत सर्व बाजूंनी दबाव वाढविला होता.
लोकसभेचे तत्कालीन सभापती ग. मा. मावळणकर यांनी पंढरपुरात येऊन यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतरच्या काळात सर्व जातींतील मंडळींना मंदिरातील प्रवेश खुला झाला.
मावळणकर यांच्या मध्यस्तीनंतर मंदिरात असणारे उत्पात तसेच बडवे यांनी सर्व समाजातील लोकांना मंदिर प्रवेशास होकार दिला. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील प्रवेशानंतर गावागावातील जातीय दरी कमी होवून गावातील पाणवठ्यावर मागासवर्गीयांना पाणी भरता येईल, सर्वत्र समानता येईल, अशी साने गुरूजी यांची भावना होती.
सुसंस्कारित पिढी घडावी यासाठी श्यामची आई यासारखं आदर्श लेखन त्यांनी केले. आईचं अंतकरण असणाऱ्या गुरुजींनी समाजात समानता यावी, सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी केलेले काम राज्यातील जनतेसाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम