Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लोकशाही आणि म्हातारीची गोष्ट

0

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ते प्रत्यक्षात आपण अनुभावतोही. पण कधी कधी देशातील लोकशाही धोक्यात आहे. अशी चर्चा घडवून आणली जाते. ते प्रत्यक्षात आहे कि नाही माहित नाही.

पण यावर काॅग्रेसचे दिवगंत जेष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी एक गोष्ट सांगितली होती. ती लोकशाहीचे स्वरूप सांगते, ती गोष्ट अशी..

“एक म्हातारी होती. ती झोपडीत राहत असे. ती अत्यंत गरीब होती.
तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतु तिथे शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली.

एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे. म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला.

तो साधू तिला म्हणाला. “म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस – मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग.

म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिटकून लटकत जातील आणि मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत.”
साधू म्हणाला ‘तथास्तु!’

विठ्ठलराव गाडगीळ

दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. सर्व ओरडत होते, “म्हातारे सोडव!, म्हातारे सोडव!” पुन्हा हात लावणार नाही असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. ती यमराजाला म्हणाली, मला आणखी काही वर्षे जगू द्या.

यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.
म्हातारी म्हणाली, “माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले.

झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिटकले आणि ओरडू लागले,
“म्हातारे सोडव, म्हातारे सोडव”
म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन.

मी इच्छा करेल त्याच वेळी मरेन.
मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.”
यमराज म्हणाले. “तथास्तु!”

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही.
तिचे नाव आहे “भारतीय लोकशाही !!”

संसदमार्ग : लोकशाहीचा राजमार्ग – लेखक बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

सध्या देशाच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये देशाची लोकशाही धोक्यात असल्याच्या आवया उठवल्या जात असताना विठ्ठलराव गाडगीळ यांनी दोन दशकापूर्वी लिहलेली हि छोटी गोष्ट खूप काही सांगून जाते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.