शेगावचे गजानन महाराज संस्थान ज्याची स्तुती अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापीठाने केलेली आहे
आज आपण २१ व्या शतकातील जगातील सगळ्यात आधुनिक देवस्थान असं ज्याच्याकडे बघितलं जाते, ज्या मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे तर अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापिठाने केलेली आहे.
स्वच्छतेसाठी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आदर्श असणाऱ्या अश्या जागतिक कीर्तीच्या शेगाव संस्थानाबद्दल. राज्य व देशात उत्पन्नाच्या बाबतीत श्रीमंत असणाऱ्या मंदिरांच्या गर्दीत मनाने श्रीमंत असणारे शेगावचे एकमेव संस्थान आहे.
भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा
शेगाव संस्थानाची भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.
आनंदसागर सारख्या प्रकल्पाची पूर्ण संकल्पना शिवशंकर भाऊ पाटील यांची आहे. त्याचा पूर्ण प्लान पण भाऊंनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात धार्मिक पर्यटन केंद्र हा तुरा रोवण्यात आनंदसागर सगळ्यात वरती आहे. आनंदसागर मध्ये आजही रोजचा जमाखर्च लिहून ठेवला जातो. इतकी शिस्त लावताना हे सगळं काम फक्त श्रद्धेने करण्यामागे शिवशंकर भाऊ पाटील ह्यांचा मोठा वाटा आहे.
17 हजार सेवाधारी
17 हजार ‘श्रीं’चे सेवाधारी संस्थानमध्ये भक्तांची सेवा करून व ‘श्रीं’च्या चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी येतात. कोणीही ट्रस्टी संस्थानमधील पाणीही पित नाहीत. जेवणाचा डबा घरून आणतात. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. त्यात आबालवृद्ध, गावखेड्यातील मुलामाणसांपासून नोकरदार, बड्या कंपन्यांमधील अधिकारीही असतात. हजारो सेवेकरी सेवेची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रत्येक गोष्टीचं आधुनिकीकरण
महाराष्ट्राचा विदर्भ हा भाग पाण्याच्या दुर्भिक्षाने नेहमीच ग्रासलेला असताना पूर्ण शेगाव शहराला पाणीपुरवठा असो वा आनंदसागर सारख्या प्रकल्पात लागणारं पाणी, इकडे असणाऱ्या निसर्गाच्या नंदनवनाला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था ही संस्थानाने केली आहे. इथे प्रत्येक गोष्टीचं आधुनिकीकरण अगदी २१ व्या शतकातल्या प्रमाणे केलं गेलं आहे. मग ते अगदी समान नेणाच्या ट्रोली पासून असो किंवा आग, नैसर्गिक आपत्तीच्या सुमारास आपातकालीन दिशादर्शक रस्ते बांधणीने असो.
दर्शनाच्या रांगेत उभं असताना पायाला चटका लागू नये म्हणून दिलेला स्पेशल रंगाचा लेप असो वा रांगेत प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था ते मातृरूम पासून २४ तास सेवेत असणारी वैद्यकीय मदत असो. अश्या सगळ्या गोष्टी करताना पण संत गजानन महाराजांनी सांगितलेला सेवाभाव त्याच श्रद्धेने जपला जातो आणि ह्याचं सर्वच श्रेय शेगाव संस्थानाला आहे.
‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत लाखो भाविक देश विदेशातून संत नगरी शेगावमध्ये येतात. ‘श्री’चे दर्शन घेवून तृप्त होतात. हे केवळ धार्मिक संस्थान नव्हे तर आदर्श व सुंदर व्यवस्थापनाचे विद्यापीठ असल्याची भावना येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम