Take a fresh look at your lifestyle.

इक्बाल शेख नावाची वेशभूषा करून छगन भुजबळ यांनी बेळगावात प्रवेश केला, चित्रपटाला शोभेल असा प्रसंग

0

३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८६ साली आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चक्क वेषांतर करत दुबईचा व्यापारी इक्बाल शेख झाले होते. पण त्यावेळी असे काय घडले की त्यांना हे वेशांतर करावे लागले.

त्यावेळी त्यांनी अगदी चित्रपटातील एखादा प्रसंग वाटावा असे नाट्य घडविले. त्याचा एक रंजक किस्सा आहे.

याबाबत खुद्द छगन भुजबळ यांनीच आपला अनुभव सोशल मिडियाद्वारे शेअर केला होता.

बरोबर पस्तीस वर्षापूर्वी बेळगाव, कारवार भागात कर्नाटक सरकारने १९८६ मध्ये कन्नड भाषेची सक्ती केली. त्यात मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचे धोरण होते. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मराठी भाषिकांची बाजू घेतली. परिणामी कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्रातील कोणालाही बेळगावला येऊ दिले जात नव्हते.

या निर्णयाच्या विरोधात शिवसेना विरोध आणि आंदोलनावर ठाम होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तशी घोषणाच केली होती. तेव्हा शिवसेनेचे आक्रमक नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी धाडस व कल्पकतेचा मिलाफ घडवीत शिवसेनाप्रमुखांचा तो आदेश प्रत्यक्षात आणला.

अगदी चित्रपटातील प्रसंग वाटावा

तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सीमेवरील हे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने भुजबळ यांनी गोवा मार्गे बेळगावला जाण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी अगदी चित्रपटातील एखादा प्रसंग वाटावा असे नाट्य घडविले. त्यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली.

मंडळी बेळगावात कशी दाखल झाली?

मुंबईहून एक अॅम्बसेडर कार घेऊन ते गोव्याहून बेळगावात दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास ते बेळगावात दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या विरोधात गनिमी काव्याने शिवसेनेचे आंदोलन केले. या आंदोलनानंतर कर्नाटक पोलिसही ही मंडळी बेळगावात कशी दाखल झाली? या प्रश्नाने आश्चर्यचकीत झाली.

भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली

त्यांनी भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. अटक केल्यावर त्यांची रवानगी धारवाड कारागृहात करण्यात आली. दोन महिने त्यांना कारागृहात काढावे लागले. दोन महिन्यांनी सुटका झाल्यावर ते मुंबईत परतले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीवर थाप देत कौतुक केले.

मराठी भाषिकांसाठी झालेल्या त्या आंदोलनाला आज बरोबर पस्तीस वर्षे झाली. यावेळी भुजबळांसोबत दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक व असंख्य शिवसैनिक होते. प्रमोद नलावडे यांनी वेशभूषा करण्यात त्यांना मदत केली होती. हे सुध्दा भुजबळ आवर्जून सांगतात.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.