काँग्रेसचा अँग्री मॅन : पाच वेळा राजीनामा दिला तरी कॉंग्रेस सोडली नाही
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गुरुदास कामात विद्यार्थी चळवळीतून पुढे आले. मुंबईच्या स्थानिक राजकारणात ते पुढे केंद्रीय राजकारणात देखील त्यांनी आपला ठसा उमठवला
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गुरुदास कामात विद्यार्थी चळवळीतून पुढे आले. मुंबईच्या स्थानिक राजकारणात ते पुढे केंद्रीय राजकारणात देखील त्यांनी आपला ठसा उमठवला. त्यांच्या रूपाने एक सर्वसामान्य तरुण देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो, हे सगळ्या देशाने पहिले.
गुरुदास कामत हे मूळचे कर्नाटकच्या कारवार या मराठी प्रांतातले. पण वडील प्रीमियर कंपनीत कामाला असल्याने बराच काळ ते मुंबईतच राहिले.
गुरुदास कामत यांचे शालेय शिक्षण कुर्ल्यातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कॉमर्स शाखेसाठी माटुंग्यातील पोतदार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पोद्दार कॉलेजमध्ये असताना ते बॅडमिंटन टीमचे नेतृत्त्व करत, तसेच जिमखान्याचे सेक्रेटरीही होते. १९७५-७६ साली गुरुदास कामत यांची पोतदार कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले होते.
पोतदार कॉलेज नंतर कामत यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये प्रवेश घेतला. लॉं कॉलेजात असतानाही ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिले. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. विद्यार्थी चळवळीत सक्रीय असतानाच अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून, मुंबई विद्यापीठात द्वितीय आले होते.
विद्यार्थी चळवळीनंतर १९८० मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. त्यानंतर अगदी चारच वर्षात १९८४ मध्ये ते प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
तर त्यानंतर फक्त तीनच वर्षात १९८७ साली युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. याच काळात १९८४ साली ते मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल पाच वेळा खासदार झाले.
गुरुदास कामत हे २००३ मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००८ पर्यंत ते या पदावर होते. यूपीएच्या कार्यकाळात २००९ ते २०११ या काळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
कामत यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत हा संघर्ष त्यांना चुकला नाही. कुशल संघटक, उत्तम जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख असली, तरी संघटनेत प्रत्येक टप्प्यावर त्यांचा संघर्ष कायम राहिला.
२०११ मध्ये अचानक त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याचं कारण होतं मुंबई काँग्रेसमधले त्यांचे प्रतिस्पर्धी देवरा कुटुंबीय यांचं वाढत चाललेलं वर्चस्व.
मुंबई काँग्रेसमध्ये आधी देवरा कुटुंबीय आणि पुढे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत त्यांचं कधी पटलं नाही.
त्यामुळेच 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. निरुपम यांच्याशी वाद झाल्यानंतर 2017 मध्ये दिलेला त्यांचा राजीनामा तर अवघे पंधरा दिवस टिकला, त्यानंतर ते पुन्हा पक्ष कामात लागले.
गुरुदास कामत हे नव्वदीच्या दशकात युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हाही ऑस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा यांच्याशी त्यांचं पटत नव्हतं. तेव्हाही त्यांनी अशाच पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला होता.
मुळात एखादी गोष्ट पटली नाही, की ती तिथल्या तिथे बोलून दाखवायची हा कामतांचा स्वभाव. त्यामुळे गुरुदास कामत यांची ओळख मुंबई काँग्रेसचे अँग्री मॅन अशी होती. अर्थात काँग्रेस पक्की भिनली असल्याने त्यांनी पक्ष मात्र कधी सोडला नाही.
२२ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ६३ च्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने धक्याने निधन झाले. तस पाहिलं तर अनेकांना राजकारणात वयाच्या ६३ व्या वर्षी मोठं पद मिळायला सुरुवात होते. पण गुरुदास कामत यांच्या आयुष्याचा संघर्ष ६३ च्या वर्षी थांबला. पण आपल्या राजकीय जीवनात तब्बल पाच वेळा राजीनामा देवूनही त्यांनी कधी कॉंग्रेस सोडली नाही.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम