शिवशंकरभाऊ पाटील यांनी शिल्लक राहिलेले शासनाचे ८ कोटी परत केले
शिवशंकर पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्याच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
आलेला पैसा व्यवस्थित कामासाठीच खर्च करायचा आणि तो साचू द्यायचा नाही. या विचारातून शिवशंकरभाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला.
आज शेगाव संस्थानबद्दल सांगायच झालं तर इथे सर्वात देखणं आणि तितकच नावाजलेलं अस इंजिनियरिंग कॉलेज आहे. भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंदसागर सारखा ६५० एकर मध्ये पसरलेला परिसर असो या परिसरात आज कागदाचा एक तुकडा देखील पडलेला दिसत नाही. स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण या तत्वांवर त्यांनी संस्थानचा कारभार सांभाळला.
जन्म आणि शिक्षण
शिवशंकर सुखदेव गणेश पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० रोजी झाला. ३१ ऑगस्ट १९६२ पासून शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त बनले. १९६९ ते १९९० पर्यंत असे सतत वीस वर्षे श्री संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत होते.
राजकीय आणि सामाजिक कारकीर्द
शेगाव नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून १९७४ ते १९७९ पर्यंत सतत पाच वर्षे त्यांनी कार्य पाहिले. श्री गजानन शिक्षण संस्था स्थापन करून त्या माध्यमातून शिवशंकरभाऊ पाटील यांनी गाव आणि परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना इंजिनियर बनवून केवळ भारतातीलच नव्हे तर परराष्ट्र मध्ये सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदापर्यंत पोहोचविले.
भाऊंनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज इंजिनिअर कॉलेज स्थापन शेगाव नगरीला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले. पण त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले होते.
शिवशंकर भाऊ यांच्या परिवारात पत्नी दोन मुलं श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीलकंठदादा पाटील व श्री संत गजानन महाराज इंजिनिअर कॉलेज चे कार्यकारी संचालक श्रीकांत दादा पाटील ,तीन विवाहित मुली ,नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
म्हणून तब्बल ६३० कोटी परत केले
मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित तेव्हा जागतिक अशा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना भाऊंच काम माहित होतं. ते भाऊंना म्हणाले या कामासाठी किती पैसे हवेत. बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक देण्यात आला. विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. किती खर्च येईल याचा हिशोब करण्यात आला. हिशोब लागला ७० कोटींचा.
संस्थानला ७० कोटींची आवश्यकता होती. ७० कोटी वापरण्यात आले आणि ६३० कोटी परत करण्यात आले.
शासनाचे ८ कोटी केले परत
अगदी मागच्या काही दिवसातील उदाहरण पाहायचं तर शेगाव येथील गजानन महाराज संस्थानला शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी कोविड सेंटर उभारण्यासाठी देण्यात आला होता.
पण संस्थानाने मात्र २ कोटी रुपयांमध्ये संस्थानाने कोविड सेंटर उभारले आणि उरलेले शासनाचे ८ कोटी संस्थानाने परत केले.
या दोन्ही प्रसंगामधून आपल्याला संस्थांनचा आणि शिवशंकरभाऊ पाटील यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केलेला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव होय.
या मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ पाटील यांच्याकडे वयाच्या अठराव्या वर्षी श्रींच्या आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले.
संस्थानच्या माध्यमातून विविध सेवाकार्य चालविणारे श्री संत गजानन महाराज संस्थान श्रद्धा, विश्वास आणि भक्ति ही त्रिसूत्री पक्की करून भाऊसाहेब शिवशंकर भाऊ आजवर कार्यरत होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली..
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम