प्रशांत किशोर : मोदी-भाजपला सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस
नरेंद्र मोदी आणि भाजपला देशात सत्तेत पोहचविण्यासाठी काम करण्यापासून मोदी-शहा यांना सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रमही प्रशांत किशोर यांच्याच नावावर आहे
पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाला जसे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना कौल देवू लागले तसं पुन्हा एकदा देशभरातल्या मिडीयामध्ये एका माणसाच्या नावाची चर्चा होवू लागली, ते नाव म्हणजे प्रशांत किशोर.
कारण काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी बंगाल मध्ये भाजपला १०० पेक्षा जास्त जागा आल्या तर आपले राजकीय रणनीतीचे काम सोडण्याची घोषणा केली होती. बंगालचा शेवटचा निकाला जेव्हा हाती आला तेव्हा भाजपच्या जागा होत्या ७७ अर्थात प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला.
तरीही प्रशांत किशोर यांनी घोषणा केली,
`पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून हे काम अनेक वर्षं केलंय. खूप कष्टाचं काम आहे हे. मी माझ्या बायको आणि मुलाला भेटून महिने लोटलेत. मी माझी कंपनी आयपॅक सोडतो आहे. कंपनीत माझ्याशिवायही अनेक सक्षम सहकारी आहेत. ते सांभाळतील. गेली आठ नऊ वर्षं हेच काम करतोय. पुष्कळ झालं. आता माझं आयुष्य मला कुठे घेऊन जातं ते बघूया.`
प्रशांत किशोर यांच्या या घोषणेमुळे ते पुन्हा सक्रीय राजकारणात येणार कि नवीन काही सुरु करणार याची चर्चा सुरु झाली. पण प्रशांत किशोर यांची कारगीर्द नक्की काय आहे. ते पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
बिहार ते गुजरात व्हाया संयुक्त राष्ट्रसंघ
प्रशांत किशोर यांचे मूळ गाव बिहारमधल्या रोहतास जिल्ह्यातलं पण पेशाने डॉक्टर असलेले वडील श्रीकांत पांडे शेजारच्या बक्सर जिल्ह्यात जाऊन राहिले. तिथेच प्रशांत किशोर यांचं शिक्षण झालं. वडील डॉक्टर असल्याने आरोग्य हा लहानपणापासून अनुभवलेला विषय. पुढे सार्वजनिक आरोग्य हाच विषय घेऊन त्यांनी करियरची सुरवात केली.
संयुक्त राष्ट्रात पब्लिक हेल्थ प्रोफेशनल म्हणून आठ वर्षं काम केलं. आफ्रिकेतल्या चाड या छोट्या देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या कामात योगदान दिलं.
संयुक्त राष्ट्रसंघात काम करत असतानाच प्रशांत किशोर यांनी एक संशोधनपर निबंध सादर केला होता. भारतातल्या तुलनेने विकसित राज्यांत मुलांच्या कुपोषणाची समस्या मोठी आहे. गुजरातसह इतर काही राज्यातील त्यांनी विश्लेषण केले होते.
त्या अहवालावरूनच तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची भेट झाली.
काही काळ पत्रव्यवहार-चर्चा असं होत अखेर ते नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करू लागले. अशी माहिती किशोर यांनीच “दि लल्लनटॉप” या वेबसाईटला एका मुलाखती मध्ये दिली आहे.
२००९ पासून प्रशांत किशोर नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करू लागले. २०१२ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नवनव्या कल्पना वापरल्या गेल्या यामागे प्रशांत किशोर यांच्या सुपीक डोक्याचीच झलक होती. असं म्हटलं जात. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या मुख्य टिममध्ये काम करू लागले.
चाय पे चर्चा आणि गुजरात मॉडेल
प्रशांत किशोर यांच्या कामाची सर्वाधिक चर्चा झाली ती २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी भाजपचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार म्हणून प्रचाराची कमान हाती घेतली तेव्हा प्रशांत किशोर म्हणजेच पीके हे नाव देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनू लागलं.
लोकसभा निवडणूकीपूर्वी देशभरात मोदी यांच्या गुजरात मॉडेलची देशभर चर्चा झाली. यामागे देखील रणनीतीच होती.
सिटिझन्स फॉर अकाऊंटेबल गवर्नन्स म्हणजे कॅग या नावाने त्यांनी देशभरातल्या २०० प्रोफेशनलना एकत्र आणून एक एनजीओ सुरू केली होती. तिच्यामार्फत मोदींसाठी त्यांनी चाय पे चर्चा, रन फॉर युनिटी, मंथन अशा एकामागून एक धडाकेबाज प्रसिद्धी मोहिमा आखल्या.
सोशल मीडियाच्या मदतीने मोदींच्या भव्यदिव्य प्रतिमानिर्मितीचा खेळ रचला. तो यशस्वी देखील झाला. त्या काळात प्रचाराच्या बाबतीत ते मोदींचे सगळ्यात जवळचे सहकारी मानले गेले.
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात मोठं पद मिळून डोक्यातले विकासप्रकल्प राबवण्याची संधी मिळेल, असं प्रशांत किशोरना वाटत होतं, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. पण तसं घडलं नाही.
अर्थात प्रशांत किशोर मात्र ही गोष्ट स्वीकारत नाहीत.
त्याचवेळी उत्तर प्रदेशातून भाजपला सर्वाधिक यश मिळवून देत अमित शहा यांचा देशाच्या राजकारणात नव्याने उदय झाला. भाजपमधील सर्वात यशस्वी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ते समोर आले. अगदी राजकारणातील चाणक्य म्हणून ते ओळखले जावू लागले. त्यामुळे प्रशांत किशोर यांचे भाजपमधील पंख कापण्याचं काम सुरू झालं.
भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत न जमल्याने अखेर ते भाजपपासून वेगळे झाले. कॅग या त्यांच्या एनजीओची पुनर्रचना करत त्यांनी आयपॅक म्हणजे इंडियन पोलिटिकल ऍक्शन कमिटी या कंपनीची सुरवात केली आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सुरु केले.
राजकीय पक्षाच्या बाहेरही पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी.
आयपॅक आणि राजकारण
भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदा बिहार निवडणूकवर लक्ष केंद्रित केले. भाजपच्या विरोधात नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी एकत्र येऊन महागठबंधन उभारलं होतं. त्याची रणनीती प्रशांत किशोर आखत होते.
अमित शहांच्या प्रचंड मोठ्या निवडणूक यंत्रणेला अंगावर घेत त्यांनी महागठबंधनला यश मिळवून दिलं.
बिहार निवडणुकांसाठी रणनीती आखता आखता प्रशांत किशोर यांनी अचानक सक्रिय राजकारणात उडी घेतली. सप्टेंबर २०१८ला त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षात प्रवेश केला. प्रवेश करतानाच ते राष्ट्रीय उपाध्यक्ष बनले.
नवा बिहार घडवण्यासाठी ते ब्ल्यू प्रिंट बनवत होते. पण सीएएच्या मुद्द्यावरून त्यांनी नितीश यांच्या वैचारिक बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाला नितीश यांनी निवडावं, असा सल्ल्यामधून हल्ला त्यांनी केला. पुढे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं.
त्यानंतर प्रशांत किशोर सांगतात,
मी स्ट्रॅटेजिस्ट म्हणून यशस्वी असलो तरी राजकारणी म्हणून अपयशी ठरलोय.
बिहारनंतर त्यांनी पंजाब विधानसभेत त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काँग्रेसला मोठं यश मिळवून दिलं. ही घोडदौड सुरू असताना उत्तर प्रदेशाने त्यांना ब्रेक लावला. उत्तरप्रदेश मध्ये पुन्हा भाजप आणि प्रशांत किशोर आमने-सामने आले. पण यावेळी मात्र भाजपने दणदणीत ३०० प्लस जागा जिंकल्या आणि काँग्रेस अवघ्या सात जागांवर रखडली. प्रशांत किशोर यांना स्ट्रॅटेजिस्ट म्हणून हा मोठा धक्का मानला गेला.
उत्तर प्रदेशच्या अपयशानंतर प्रशांत किशोर यांनी आणखी दोन यशस्वी निवडणुकांची आखणी केली. २०१९मधे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला तर २०२०मधे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळवून दिलं.
२०१९ मध्येच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं होतं. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना राज्यस्तरीय नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला. “आदित्य संवाद” म्हणून त्यांनी मोठा इव्हेंट देखील केला.
पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी
कालच्या निकालानंतर प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत आले आहेत. कालच्या निकालातील पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात प्रशांत किशोर यांना यश मिळाले आहे. पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जींसाठी तर त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. मोदी-शहांच्या प्रत्येक हल्ल्याला त्यांनी प्रतिहल्ल्याने उत्तर दिलं.
स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करताना यावेळी त्यांनी काही मुलाखतीमधून थेट भाजपवर हल्ला चढवला. बंगाल मध्ये तृणमूल पक्ष सोडताना अनेक नेत्यांनी प्रशांत किशोर यांना दोषी ठरवलं. पण ममता बॅनर्जींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि तिथे त्यांना यश मिळाले देखील.
दुसरीकडे तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या द्रमुकसाठी देखील त्यांनी काम केलं. तामिळनाडू मध्ये करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक. दीर्घकाळ राज्याचे नेतुत्व करणारे नेते नसताना नवख्या एम.के. स्टॅलिन यांना राज्याचं सर्वोच्च नेतृत्व म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान प्रशांत किशोर यांनी यशस्वी पार पाडलं. असं म्हणता येईल.
पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट सोडण्याची घोषणा
काल निवडणूक निकालानंतर आयपॅक सोडण्याची घोषणा केल्यानंतर प्रशांत किशोर काय करणार अशी चर्चा रंगली आहे. ते पुन्हा सक्रिय राजकारणात येतील, अशीही शक्यता आहे.
पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघ किंवा नंतर भारतात वेगवेगळ्या राज्यात केलेले त्यांच काम पाहता त्यांचा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून संन्यास अनपेक्षित नाही. यापुढे ते कदाचित एखाद्या राज्यात प्रशासकीय पदावरही जाऊ शकतात. पण राजकारणाच्या परिघाबाहेर जाणं त्यांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव पाहता शक्य वाटत नाही.
नरेंद्र मोदी आणि भाजपला देशात सत्तेत पोहचविण्यासाठी काम करण्यापासून मोदी-शहा यांना सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रमही प्रशांत किशोर यांच्याच नावावर आहे आणि राहिलही. सध्याच्या भारताच्या राजकरणाकडे पाहता या बाबतीत देशातला एकही नेता त्यांच्या जवळपासही फिरकत नाही.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम