आणीबाणीनंतर कॉंग्रेसमधून जे मुठभर लोक लोकसभेत पोहचले, त्यात अहमद पटेल होते
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज सकाळी पहाटे निधन झाले. अहमद पटेल यांना राजकीय वर्तुळात कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जात होते.
अहमद पटेल यांननी दीर्घकाळ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पहिले. याशिवाय त्यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव म्हणून काम पाहिले. कॉंग्रेसमध्ये गांधी परिवाराशी एकनिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जातात.
गुजरातच्या अंकलेश्वर येथे जन्मलेल्या अहमद पटेल यांनी १९७७ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी भरुच येथून लोकसभा निवडणुका जिंकून, सर्वात तरुण खासदार झाले. आणीबाणीच्या विरोधात त्यावेळी देशात जनता पक्षाची लाट उसळली होती. अशा परिस्थितीत त्यांचा विजय इंदिरा गांधींसह सर्वच राजकीय पंडितांसाठी धक्कादायक घटना होती. 1993 पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
मंत्रीपदाची ऑफर नाकारली
अहमद पटेल दीर्घकाळ कॉंग्रेसच्या सक्रीय राजकारणात सक्रीय आहेत. १९७७ च्या निवडणूकीत इंदिरा गांधी यांनाही पराभव होण्याची चिन्हे दिसत असतानाही अहमद पटेल यांनीच इंदिरा गांधी यांना त्यांच्या विधानसभा जागेवर सभा घेण्यास भाग पाडले.
तर त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात जेव्हा कॉंग्रेसचा पराभव झाला, तेव्हाही जे मुठभर लोक संसदेत पोहोचले, त्यामध्ये अहमद पटेल यांचा समावेश होता. १९८० च्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस सत्तेत परतली. तेव्हा इंदिरा गांधी यांनी अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात मंत्री होण्याविषयी विचारले. तेव्हा अहमद पटेल यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत, मंत्रीपदाची ऑफर फेटाळून लावली होती.
सोनिया गांधीना राजकारणात प्रस्थापित करण्यात वाटा
राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहरावांसारख्या नेत्यांशी संबंध बिघडत असूनही सोनिया गांधी कॉंग्रेसला ताब्यात घेण्यास सक्षम झाल्या. राजकारणात राहिल्या आणि टीकल्या तर त्यामागे अहमद पटेल यांचा मोठा हात आहे. सोनिया गांधींना भारतीय राजकारणात प्रस्थापित करण्यात अहमद पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असं म्हणता येईल.
कॉंग्रेसच्या तीन पिढ्यांशी संबंध
७१ वर्षीय अहमद पटेल यांचे गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांशी (इंदिरा, राजीव आणि सोनिया आणि आता राहुल) विश्वासाचे नाते राहिले आहे. तर कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांमध्ये पटेल यांचा थेट सबंध होता.
गुजरातच्या राजकारणात ते अहसन जाफरी यांच्यानंतर कॉंग्रेसचा सर्वात मोठा मुस्लिम चेहरा मानला जातो. गुजरात दंगलीच्या वेळी अहसान जाफरी मारला गेला. अहमद पटेल हे सध्या गुजरातमधील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
अहमद पटेल यांना सक्रीय राजकारण करण्यामध्ये कधीच रस नव्हता. पडद्यामागील राजकारणावर त्याचा विश्वास होता. त्यांच्या पडद्यामागच्या हालचालीवर अनेक लेख लिहिता येतील. हेही नक्की
कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम