पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी केलेल्या कारवाईमुळे नांगरे पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले होते
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानीया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.
आपल्या शालेय जीवनात विश्वास नांगरे पाटील हे खूप हुशार होते. दहावी मध्ये असताना त्यांचा तालुक्यात पहिला क्रमांक आला होता. महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असताना देखील विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभियांत्रिकी ला न जाता कला शाखेला प्रवेश घेतला होता.
महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
औरंगाबादने दिले वेगळे वळण
विश्वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले.
कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपालीताई हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास त्यांच्या मित्रांसोबत मुलगी बघायला गेले.
दोनदा झाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात रुपालीताई यांना काही वेळच विश्वास यांच्या समोर येता आले. त्यामुळे पहिल्या भेटीत या दोघांमध्ये फार बोलणे झाले नाही. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपालीताई यांना पडला होता.
यामुळे पुन्हा दुसर्या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपालीताई एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती.
प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.
२६/११ चा दहशतवादी हल्ला
२६/११ च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच (बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले.
त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरूच होती.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम