जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्याच सुरक्षारक्षकांच्या गाडीच्या चाव्या नालीत फेकल्या होत्या
राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे.
राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली.
सुरक्षा वाढल्यामुळे राजीव नेहमी आपल्याच सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत. राजीव जेव्हा जेव्हा असे करत असे तेव्हा त्यांच्या एसपीजी अधिकाऱ्यांची झोप उडायची. राजीव गांधींना स्वत: जीप चालवायला आवडायची, तिही अतिशय वेगाने…
सुरक्षारक्षकांच्या गाडीच्या चाव्या
१ जुलै १९८५ चा प्रसंग.
दिल्लीत जोरदार पाऊस पडत होता. अचानक एअर चीफ मार्शल लक्ष्मण माधव काटरे यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी काटरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी श्रीमती काटरे यांच्याबरोबर सुमारे पंधरा मिनिटे घालवली.
राजीव गांधी पंतप्रधान असल्याने त्यांच्या बरोबर त्यांची संपूर्ण सुरक्षा होती. काटरे यांच्या भेटीनंतर सोनिया गांधी राजीव यांच्या गाडीत बसतील की दुसऱ्या गाडीतून इतरत्र जातील हे एसपीजीला माहीत नसल्यामुळे सोनियांचे सुरक्षा कर्मचारीही त्याच सुरक्षा रक्षकांसोबत चालत होते.
राजीव गांधी काटरे यांच्या घरातून बाहेर आले तेव्हा त्यांना तेथे अनेक गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांनी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या पोलीस अधिका-याला या गाड्या त्यांच्या मागे येणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले.
पण जेव्हा ते सोनियांबरोबर जीपमध्ये बसले. तेव्हा त्यांना मागे येणाऱ्या सर्व गाड्या दिसल्या. कदाचित पोलीस अधिका-याला त्यांच्या सूचना समजू शकल्या नाहीत.
राजीव यांनी अचानक आपली जीप थांबवली. मुसळधार पावसात ते गाडीतून बाहेर पडले. मागे येणाऱ्या एस्कॉर्ट गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याची चावी काढली. मग त्यांनी मागे धावणाऱ्या आणखी दोन गाड्यांच्या चाव्या काढून टाकल्या.
पंतप्रधानाच्या गाडीचा ताफा थांबलेला दिसताच दिल्ली पोलिस उपायुक्तांनी आपली गाडी पुढे आणली. राजीवने काहीही न बोलता त्यांच्या देखील गाडीची चावी काढली. तेव्हा मात्र त्यांनाही काय करावे सुचलेच नाही.
गंमत म्हणजे राजीव गांधींनी सर्व गाडीच्या चाव्या पाण्याने भरलेल्या नाल्यात फेकून दिल्या.
एकट्या सोनियांबरोबर ते पुढे गेले. एसीपीजींना काय करावं ते समजत नव्हतं. पाऊस पडत होता आणि पंतप्रधानांच्या ताफ्याच्या सहाही गाड्या चावीशिवाय दिल्लीच्या राजाजी मार्गावर मधोमध उभ्या होत्या. तर पंतप्रधान राजीव कुठे आहेत ? याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.
पंधरा मिनिटांनंतर राजीव सात रेसकोर्स रस्त्यावर पोहोचल्याचं कळताच सुरक्षरक्षकांच्या जीवात जीव आला. त्याच दिवशी संध्याकाळी राजीव कोणताही सुरक्षा नसताना जीपने विजय चौकात पोहोचले. पण तिथले भरपूर ट्रफिक पाहून ते पुहा बाजूचा रस्ता घेऊन ७ रेसकोर्स रोडवर परतले.
दुस-या दिवशी गृहसचिव राम प्रधान यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी राजीव कडे जाऊन या घटनेचा आपला विरोध व्यक्त केला होता.
रात्री दोन वाजता पंतप्रधान ड्रायव्हिंग सीटवर
काही महिन्यांनंतर रात्री १२ वाजता राजीव गांधींनी गृहसचिव राम प्रधान यांना फोन केला. यावेळी सचिव गाढ झोपले होते. त्यांच्या बायकोने फोन उचलला. राजीव बोलले, “सचिवजी झोपले आहेत काय? मी राजीव गांधी बोलतोय. त्याच्या बायकोने त्यांना ताबडतोब उठवलं.
राजीवने विचारले, “तुम्ही माझ्या घरापासून किती दूर राहतात ? पंतप्रधान म्हणाले की, ते पंडारा रोडवर राहतात . राजीव बोलले, “मी तुमच्यासाठी माझी गाडी पाठवतोय. तुम्ही आहात तसे लवकर इथे या.”
यावेळी राजीव यांच्याकडे पंजाबचे राज्यपाल सिद्धार्थ शंकर राय होते. राय यांना त्याच रात्री चंदीगडला परत जायचं होतं, त्यामुळे राजीवने इतक्या रात्री गृहसचिवांना बोलावलं होतं. दोन तास हे लोक सल्लामसलत करत होते. रात्री २ वाजता सगळे बाहेर आले तेव्हा राजीवने सचिवजी याना त्यांच्या गाडीत बसायला सांगितलं. सचिवांना समजले की पंतप्रधानांना त्यांना गेटपर्यंत सोडायचे आहे.
पण राजीव यांनी गाडी गेटमधून बाहेर काढली आणि अचानक डावीकडे वळवली. सचिव प्रधान यांना म्हणाले, “पंडारा रस्ता कोणत्या बाजूला आहे हे विचारायला मी विसरलो. “
आतापर्यंत राजीव गांधी यांना काय करायचं आहे हे सचिवांना समजलं होतं. त्याने राजीव गांधींचं स्टिअरिंग पकडलं आणि म्हणाले, “सर, तुम्ही जर गाडी थांबवली नाही तर मी चालत्या गाडीतून उडी मारेन.”
सचिवांनी त्यांना आठवण करून दिली की, आपण असे धोके पत्करणार नाही. मोठ्या अडचणीमुळे राजीव गांधींनी गाडी थांबवली आणि गृहसचिव दुस-या गाडीत बसेपर्यंत तिथेच उभे राहिले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम