Take a fresh look at your lifestyle.

एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार !

मंत्रीपदाच्या अनेक ऑफर नाकारत गणपतरावांनी आयुष्यभर लाल बावटा अभिमानाने खांद्यावर मिरवला.

0

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी सुद्धा नेत्यांची नवी फळी तयार केली.

त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षातीलही अनेक नेते कॉंग्रेसमध्ये नेले. त्यावेळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. यात अनेक दिग्गज नेत्यांची नावे सांगता येतील.

पक्षाच्या स्थापनेपासून असलेली कॉ. दत्ता देशमुख, क्रांतिवीर नाना पाटील, व्ही. एन. पाटील ही मंडळी प्रथम पक्षाबाहेर गेली. नंतर शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव हे पक्षाचे संस्थापकच कॉंग्रेस पक्षात गेले.

पण अश्या परिस्थितीतही आश्वासनांना बळी न पडता एक आमदार मात्र आपल्या पक्षासोबत कायम राहीला तो आमदार म्हणजे गणपतराव देशमुख

यशवंतराव चव्हाण यांचा निरोप

गणपतराव देशमुख यांची तब्बल ५० हून अधिक वर्षाची संसदीय कारकीर्द आहे. १९५१ साली ते विधानसभेत निवडून आले. त्यानंतर २०१९ पर्यंत (एक अपवाद वगळता) सांगोला विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या जवळपास ६० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये गणपतराव यांनी एकदाही पक्ष बदलला नाही.

गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

“अनेक वेळा मला कॉंग्रेसमध्ये बोलावण्यात आलं. स्वत:  यशवंतरावांनीच मला त्याबद्दलचा निरोप काडादींमार्फत पाठवला होता. काडादी कॉंग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, दाजिबा देसाई, एन.डी. पाटील, मी, अशा आम्ही सर्वांनी मिळून पक्ष पुढे न्यायचा ठरवलं आहे. शब्द मोडून कॉंग्रेस पक्षात यायचं, हे योग्य होणार नाही.”

पुढे यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शेकापमधील अनेक दिग्गज नेते कॉंग्रेसमध्ये गेले. मागच्या काही वर्षात तर शेकापचा राज्यभरातलं नेतृत्व संपत गेले. पण गणपतराव मात्र कायम राहिले.

मंत्रीपदाची ऑफर तरीही पक्षातर नाही

यशवंतराव चव्हाण दिल्ली मध्ये गेल्यानंतर वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी देखील गणपतराव यांना १९७२सालच्या निवडणुकीनंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी वसंतराव नाईक यांनी शंकरराव पाटील यांच्या मार्फत निरोप पाठवला होता,

“तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. सोलापूर जिल्ह्यातून कोणी मंत्री नाही. तुम्हाला आम्ही राज्यमंत्रिपद देऊ.”

मंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर देखील गणपतराव यांनी वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला,

“आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाही. सत्तेचं अजिबात आकर्षण नाही. माझ्याकडं काही नसताना मला लोकांनी मदत केली आहे. माझे सहकारी जिवाभावाचे आहेत. माझ्या हातून पक्षांतर घडणार नाही.”

एक पक्ष, एक मतदारसंघ आणि ११ वेळा आमदारकीचा विश्वविक्रम

सांगोला विधानसभा मतदारसंघातून गणपतराव देशमुख १९६२ पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. १९६२ साली ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून २०१९ पर्यंत ते विधानसभेत राहिले. यात अपवाद फक्त दोन निवडणुकांचा १९७२ आणि १९९५ सालचा.

त्यातही १९७२ सालच्या पराभवानंतर एकाच वर्षानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून गेले होते. तर १९९५ साली फक्त १९२ मतांनी पराभव झाला होता.  त्यामुळे एक पक्ष, एक मतदारसंघ आणि ११ वेळा आमदार असा विश्वविक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे.

तब्बल ११ वेळा आमदार आणि ५० हून अधिक वर्ष विधानसभेत कामकाज करताना गणपतराव देशमुख फक्त दोनदा मंत्री राहिले.

१९७८ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा बिगर-काँग्रेस सरकार सत्तेचा प्रयोग झाला. यात शरद पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते.

या सरकारमध्ये गणपतराव देशमुख मंत्री झाले. पण हे सरकार फार काळ टिकलं नाही. इंदिरा गांधी यांनी हे सरकार बरखास्त केले.

जेव्हा पुलोदचे सरकार बरखास्त झाले, तेव्हा गणपतराव मतदारसंघात, सांगोल्यात होते. मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी, सुरक्षारक्षक होते. पण सरकार बरखास्त झाल्याची बातमी मिळताच त्यांनी सुरक्षारक्षकांना निघून जायला सांगितले, लाल दिव्याची गाडी सोडून ते एस. टी. ने मुंबईला आले.

सध्याच्या राजकारणात सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलणारे नेते पहिले कि गणपतराव यांच्याबद्दलचा आदर वाढत जातो कारण मंत्रीपदाच्या अनेक ऑफर नाकारत गणपतरावांनी आयुष्यभर लाल बावटा अभिमानाने खांद्यावर मिरवला. एवढ मात्र नक्की !!

 काल दि. ३० जुलै रोजी गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. गणपतरावांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे !

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.