शिवाजीराव निलंगेकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदारही नव्हते
महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुख्यमंत्री असे झाले त्यांनी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांना फारच कमी सत्ता मिळाली. या फार कमी काळ मुख्यमंत्री राहिलेल्या पैकी एक नाव म्हणजे शिवाजीराव निलंगेकर पाटील.
मुख्यमंत्रीपदानंतर पीएचडी
मराठवाड्यातील निलंगा हे शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचे गाव. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते सहा महिन्याचे असतानाच त्यांचे वडील वारले. पुढे आईने त्यांचा सांभाळ केला. शाळेत शिकत असतानाच ते स्वतंत्रसमरात सहभागी झाले. सेवादलात सक्रीय होवून काम करू लागले. उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबाद ला गेले. वकिलीची पदवी घेवून परत आले. राजकारणात सक्रीय झाले. आमदार झाले, मंत्री झाले.मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी पी.एच.डी. मिळवली. हि शिवाजीराव निलंगेकर यांची शैक्षणिक कारगीर्द.
मुख्यमंत्री पदाची लॉटरी
पण त्यांची राजकीय कारगीर्द सुरु होते १९५७ साली. १९५७ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली पण त्यात त्यांना अपयश आले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ते निलंगा मतदारसंघातून आमदार झाले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. वसंतराव नाईक सरकार मध्ये पुनर्वसन खात्याचे मंत्री झाले. त्यानंतरच्या काळात ते अंतुले सरकारमध्ये बांधकाम, शिक्षण, वसंतदादा पाटील यांच्या सरकार मध्ये आरोग्य तर बाबासाहेब भोसले यांच्या सरकार मध्ये पाटबंधारे खात्याचे मंत्री राहिले.
१९८५ कॉंग्रेसच्या पक्षातील अंतर्गत वादात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अचानकपणे शिवाजीराव निलंगेकर यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली.
लॉटरी लागली असे यासाठी, कारण जेव्हा त्यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. कारण १९८४ साली कॉंग्रसने लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसला कमी मताधिक्य मिळाले, अश्या आमदारांना विधानसभेला उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे कॉंग्रेसचे लोकसभेचे शिवाजीराव पाटील चाकूरकर यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे शिवाजीराव निलंगेकर यांना उमेदवारी मिळाली नव्हती. हे आवर्जून सांगाव लागते.
३ जून १९८५ रोजी शिवाजीराव निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसा निलंगेकर यांचा कार्यकाल देखील खूपच अल्पकालीन राहिला कारण त्यांना जवळपास फक्त ११ महिनेच मुख्यमंत्री पद मिळाले.
पण या कालावधीत देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ४२ कलमी कार्यक्रम, विदर्भ विकासासाठी ३३ कलमी कार्यक्रम तर कोकणच्या विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. त्यासोबत त्यांनी रोजगार हमी वरील मजुरांना मजुरीसोबत धान्य देण्याची कल्पक योजना देखील त्यांनी राबवली.
महाराष्ट्र राज्याच्या रौप्य महोत्सवी काळात त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला होता. त्यावेळी राज्याने मागच्या २५ वर्षात केलेल्या प्रगतीचे सिहावलोकन करून त्यांनी पुढच्या २५ वर्षासाठी योजना आखली होती. राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.शिवाजीराव निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक योजना आखल्या पण त्यांना त्या पूर्ण करता आल्या नाही.
कारण ते मुख्यमंत्री असतानाच मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी गुण वाढवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि याच प्रकरणामुळे त्यांना अवघ्या ११ महिन्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे या प्रकरणात त्यांचा सहभाग नव्हता हे सिद्ध झाले. पण त्यांना आपले पद गमवावे लागले.
आजोबा विरुद्ध नातू
पुढे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवाजीराव निलंगेकर यांना पराभवाचा धक्का बसला. पण ते खचले नाहीत. १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा उभा राहिले आणि निवडूनही आले. पण त्यानंतरच्याच २००४ च्या निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर मोठ्या खिंडीत सापडले. त्यांच्या विरोधात त्यांचा तरूण नातू उभा राहिला.
नातू विरुद्ध आजोबा अशी निवडणूक देशभर गाजली. पण या निवडणुकीत नातवाकडून आजोबा शिवाजीराव निलंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. पण गोष्ट इथे संपत नाही. २००९ च्या निवडणुकीत पुन्हा आजोबा नातू आमने सामने आले. या निवडणुकीत मात्र शिवाजीराव निलंगेकर यांनी नातू संभाजीराव निलंगेकर यांचा पराभव केला. हा त्यांचा लढवय्या स्वभाव होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे आज निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन !
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम