या बहीण भावांनी महाराष्ट्रातील राजकारणावर छाप टाकली आहे
राज्याच्या राजकारणात अशा काही भाऊ बहिणी आहेत, ज्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
आज रक्षाबंधन म्हणजेच भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा सण. रक्षाबंधन आज देशभरात साजरा होत आहे. प्रत्येक वेळी साथ असल्याचे वचन देऊन आज प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत आहे. कला, क्रीडा, संस्कृती यांसह राजकीय क्षेत्रात असे काही भाऊ बहिणी आहेत, ज्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
अजित पवार – सुप्रिया सुळे
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भाऊ-बहिणी यांचे नाव घेतले तर सर्वात आधी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत भाऊ-बहीण आहेत.
अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहे. अधुनमधून सुप्रिया राज्यातील राजकारणात येणार असल्याचा अफवा पसरवल्या जातात. या बातम्यांमुळे अजित पवार अस्वस्थ होत असतात. या बातम्यांचा परिणाम म्हणूनच शरद पवारांना सोडून अजित पवार काही तासांसाठी भाजपला जाऊन मिळाल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले होते.
अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. पण, त्यानंतर गेल्या वर्षभरात सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या वेळेला अजित पवार यांच्याबरोबरचे फोटो ट्विटरवर टाकत सर्व काही पूर्वीसारखंच असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे. नात्याने चुलत भावंडे असली तरी दोघांच्या नात्यात सख्ख्या भावंडांएवढाच गोडवा आहे. तसेच दोघांनीही राज्य आणि देशाच्या राजकारणावर आपली छाप आहे.
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.
पण २००९ साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.
पुढे २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांना आपल्या मतदार संघात धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि मुंडे बंधू-बघिणी यांच्यातील संघर्ष वाढत गेला. बीडमधील मुंडे भाऊ-बहिणीमधल्या निवडणुकीने महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवून आणली. बीडच्या स्थानिक निवडणुका या दोघांच्याच अवतीभोवती होताना दिसतात.
बाळासाहेब थोरात – दुर्गा तांबे
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या मंत्री असेलेल्या बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे ही सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची भावा-बहिणींची जोडी.
सध्या बाळासाहेब थोरात संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर त्यांच्या बहीण दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष आहेत.
त्यांचे पती सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आहेत. दुर्गा आणि सुधीर यांचे पुत्र सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात.
अवधूत तटकरे-आदिती तटकरे
तटकरे कुटुंबात अवधूत व आदिती हे राजकारणातले भाऊ-बहीण पाहायला मिळतात. तटकरे कुटुंबीयांमध्ये अनिल तटकरे आणि सुनील तटकरे असे दोन बंधू. अनिल हे मोठे तर सुनील हे लहान भाऊ आहेत. सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले.
अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर पुढे सुनील तटकरे यांचे दुसरे पुत्र अनिकेत तटकरे हे देखील राजकारणात सक्रीय झाले आणि विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले.
जयंत पाटील – मिनाक्षी पाटील
याच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या बहीण मिनाक्षी पाटील हे सुद्धा आहेत. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. मागील अनेक वर्ष ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहीण मिनाक्षी यांनी अनेक वर्षं अलिबाग मतदारसंघात आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम