‘लोकांनी मला वर्गणी काढून निवडून दिलं आहे’ असे म्हणत राजू शेट्टींनी पवारांचा फोन ठेवला
आपल्या आयुष्यातील पडद्यामागचे अनेक किस्से राजू शेट्टी यांनी आपल्या ‘शिवार ते संसद’ या पुस्तकातून लोकांपुढे आणले आहेत.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कोल्हापूरचा एक तरुण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा खंदा कार्यकर्ता होतो. जीवघेणे हल्ले पचवत प्रस्थापितांविरुद्ध लढे उभारतो. लोकांचे अपार प्रेम जिंकत एकापाठोपाठ जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका सहज जिंकत जातो.तो तरुण नंतर देशातील सर्वात मोठा शेतकरी नेता होतो.
लोकांनी जमवलेल्या पैशातून 2004 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पहिल्यांदा आमदार झाले.
त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनी विनवण्या केल्या, पण शेट्टी यांनी त्या धुडकावून लावल्या.
शेट्टींसारख्या सामान्य माणसाने आपली विनंती अव्हेरली याचा राग पवारांच्या मनातून गेला नाही. पण याच प्रकरणात अखेरीस शरद पवार कसे खोटे ठरले, यासारखे पडद्यामागचे अनेक किस्से राजू शेट्टी यांनी आपल्या ‘शिवार ते संसद’ या पुस्तकातून लोकांपुढे आणले आहेत.
गरीब कुटुंबातून आलेला कार्यकर्ता ‘रिझल्ट’ देणा-या शेतकरी आंदोलनांमुळे देशभर परिचित होतो. हा सगळा सामाजिक-राजकीय प्रवास शेट्टी यांनी आपल्या पुस्तकात मोकळेपणाने शब्दबद्ध केलाय.
शेतकरी संघटनेतले दिवस, पवार काका-पुतण्याबरोबरचे राजकीय संघर्ष, शेतक-यांच्या प्रश्नांवरची विविध आंदोलने आदींची सविस्तर माहिती शेट्टी यांनी या पुस्तकात नमूद केली आहे.
2004 च्या विधानसभेनंतरचे एक गुपितही राजू शेट्टी यांनी फोडले आहे. अजित पवार यांनी शेट्टींकडे पाठिंब्याची मागणी केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास असमर्थता दर्शवल्याने शेट्टी यांनी काँग्रेस आघाडी सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्यास नकार दिला.
त्यानंतर शरद पवारांच्या फोनलाही शेट्टींनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे पवार यांनी शेट्टींना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो त्यांच्याच अंगलट आल्याचे शेट्टी यांनी पुस्तकात लिहिले आहे.त्याचसंदर्भात लिहलेला हा किस्सा.
पवारांचा फोन ठेवून दिला
जयसिंगपुरात असताना मला दिल्लीहून पवारांचा फोन आला. त्यांनीही पाठिंबा देण्याची विनंती मला केली. मी त्यांनाही तेच सांगितलं. त्यावर ते म्हणाले, ‘मी अटी घालून कुणाचा पाठिंबा घेत नाही.’ मी म्हणालो, पाठिंब्यासाठी तुम्ही मला फोन केला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की, अटी घातल्याशिवाय मी कुणालाही पाठिंबा देणार नाही.
लोकांनी मला वर्गणी काढून निवडून दिलं आहे. एवढं सांगून मी फोन ठेवून दिला. आपला फोन ठेवणाराही कोणी तरी आहे आणिशेतकऱ्यांच्या मनात किती खदखद आहे, हे त्यांना कळावं. एवढ्यासाठीच हे केले. यात उद्धटपणा नव्हे, तर बाणेदारपणा होता.’असे राजू शेट्टी यांनी लिहल आहे.
असे खोटे पडले पवार
राजू शेट्टी यांच्या पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून पुढे बरेच वादंग झाला. पवारसाहेब बऱ्याच वेळा कोल्हापूरला आले.
मी फोन केलेला नसताना राजू शेट्टी सवंग लोकप्रियतेसाठी मी फोन केला होता, असं सांगत फिरतात
असं जाहीर वक्तव्य शरद पवार यांनी एका ठिकाणी केले.
त्यावर राजू शेट्टी यांनी पुन्हा सांगितलं की, कृषी भवनातून ऑक्टोंबर महिन्यात जयसिंगपूरला किती एसटीडी कॉल झाले याची चौकशी करा. त्यानंतर मात्र ती चर्चा थांबली,’ असे शेट्टी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रराजू शेट्टी यांचा पराभव झाला. या पराभवामुळे राजू शेट्टी संसदीय राजकारणातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड केली जाणार आणि तेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून. अश्या चर्चा सुरु आहेत.
त्यामुळे एकेकाळी शरद पवार यांचा फोन कट करणारे राजू शेट्टी आज पुन्हा पवार यांच्या कॉलची वाट पाहत असतील का ? असा प्रश्न आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम