नाराज काकासाहेबांचा राजीनामा परत घेण्यासाठी पंतप्रधान नेहरू स्वतः गेले होते
कॉंग्रेस पक्षातून सध्या अनेक दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना समजावण्याचा किंवा त्यांनी पक्षात राहावे यासाठी कॉंग्रेसच्या हायकमांड कडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अगदी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे खास मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट हे देखील पक्षावर नाराज झाले पण राहुल गांधी त्यांना समजावू शकले नाही.
पण याच कॉंग्रेसमध्ये असे नेते होवून गेले जे आपल्या सहकाऱ्यांना समजावून घेत होते. असाच एक किस्सा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात मंत्री राहिलेल्या काकासाहेब गाडगीळ यांच्या संदर्भातला आहे.
जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी आपल्या एका लेखामध्ये हा प्रसंग लिहिला आहे.
अनंत बागाईतकर लिहितात,
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितलेली ही आठवण ! त्यांचे वडील काकासाहेब हे पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. दोघांमध्ये उत्तम संबंध होते. पण काही मुद्द्यांवरून मतभेद झाले आणि नेहरूंनी काकासाहेबांची बाजू न्याय्य असूनही काहीसा दुर्लक्षिण्याचा पवित्रा घेतला. स्वाभिमानी काकासाहेबांनी तडक मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
नेहरूंना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रथम काही मध्यस्थांमार्फत काकासाहेबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आले नाही. मग एक दिवस नेहरू तडक काकासाहेबांच्या बंगल्यावर जाऊन थडकले. शिष्टाचार पाळून काकासाहेबांनी त्यांचे स्वागत केले. चहा आला.
नेहरूंनी खडा टाकला की ते चहा घेतील, पण त्याआधी काकासाहेबांनी राजीनामा मागे घ्यावा.
नेहरूंनी राजीनामापत्र बरोबर आणले होते. मानी काकासाहेब राजीनामा मागे घेण्यास तयार होईनात. त्यांनी नेहरूंनाच सांगितले की तुम्ही पंतप्रधान आहात, राजीनाम्याचे काय करायचे त्याचा सर्वाधिकार तुम्हाला आहे. नेहरूंही अडून बसले. परंतु नेहरूंनी चतुराई दाखवली.
तेथेच लहानगे विठ्ठलराव खेळत होते. नेहरूंनी “विठ्ठल, इधर आओ’ म्हणून त्यांना बोलावले आणि राजीनामापत्र देऊन ते फाडण्यास सांगितले. मग काकासाहेबही विरघळले. पेच संपला ! पण आता कॉंग्रेसमध्ये ना काकासाहेब आहेत, ना नेहरू !
काकासाहेब गाडगीळ पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर पंजाबचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम