Take a fresh look at your lifestyle.

एकेकाळी निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं होत !

0

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं आहे.

सर्व सोयी सुविधा असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणाची तसंच उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं. त्याचं उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

कोण आहेत निलेश लंके ?

लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.

निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली.वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली.पण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.

 हजारो कार्यकर्ते जोडले आहेत

आमदार निलेश लंके यांच्या मदतीच्या स्वभावामुळे केवळ पारनेर नगर मतदारसंघातीलच नाही, तर राज्यभरातील अनेक जण त्यांच्याकडे येतात. अनेकजण मुंबईत आले असताना त्यांच्या आमदार निवासाचा उपयोग करतात. स्वतः निलेश लंके यांनीच सर्वांना त्यांचा आमदार निवास उपलब्ध करुन देण्यास सांगितलंय. त्यामुळे आपल्या आमदारकीचा बडेजाव न करता सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या या सवयीने त्यांनी राज्यभरात हजारो कार्यकर्ते जोडले आहेत.

 असाच आमदार निवासामधील एक फोटोदेखील समोर आला होता. तिथं देखील लंके यांचे कार्यकर्ते बेडवर झोपले होते तर लंके जमिनीवर.

आमदार निलेश लंके पहाटे 4 वाजता मुंबईतील आपल्या आमदार निवासात पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आलेले कार्यकर्ते झोपले होते. त्यामुळे त्यांनी या कार्यकर्त्यांना उठवले नाही. कार्यकर्त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून ते स्वतः एका कोपर्‍याला असलेल्या जागेत झोपले. त्यामुळे कार्यकर्ते गादीवर आणि आमदार जमिनीवर असं दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं.

एका कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलमध्ये हे फोटो क्लिक केले होते .  निलेश लंके यांनी मुंबईच्या आकाशवाणीतील त्यांच्या आमदार निवासात सर्वांना राहण्याची मुभा दिलीय. त्यामुळे त्यांच्या निवासात नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे याआधी देखील लंके यांचा कार्यकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतःची गैरसोय होऊ देणाचा स्वभाव समोर आला होता. म्हणूनच त्यांची ओळख सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणार आमदार अशी झालीय

ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या  निवडणूका  बिनविरोध पार पाडल्या

पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. त्यामुळे यावर बैठक घेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता .

निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली होती. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असं लंके यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं गेलं होत.

लंकेमुळे महाविकास आघाडीत वाद?

शिवसेनेतून काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 ची विधानसभा निवडणुक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते निवडून आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 4 जुलैला पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.

‘आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही’ असं त्यावेळी त्या नगरसेवकांनी स्पष्ट केलं होतं. बंडखोरी करणारे नगरसेवक हे निलेश लंके यांचे जुने कार्येकर्ते होते. ‘आम्ही निलेश लंके यांच्यासोबत राहणार पुन्हा शिवसेनेत जाणार नाही,’ असं या नगरसेवकांचं त्यावेळी म्हणणं होतं.

6 जुलै रोजी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. 7 जुलैला शिवसेनेच्या अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पाच नगरसेवक पुन्हा पक्षात पाठविण्यासाठी अजित पवरांकडे निरोप पाठवल्याचं वृत्त आलं.त्यानंतर ‘आम्ही परत जाणार नाही’ असे म्हणणारे नगरसेवक मुंबईत पोहोचले, त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि नंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या लंकेंसाठी या नगरसेवकांनी शिवसेना सोडली होती तेच लंके या नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घेऊन गेले होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.