नेहरूंनी वाजपेयी यांची भावी पंतप्रधान म्हणून ओळख करून दिली होती
लोकसभेचे माजी सभापती अनंतशायम अय्यंगार यांनी एकदा सांगितलं होतं की, लोकसभेत इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तम वक्ता शोधून सापडणार नाही. वाजपेयींचे जवळचे मित्र अप्पा घटाटे यांनी जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले की, “असं असेल तर मग त्यांना बोलू का दिलं जात नाही?”
तेव्हा वाजपेयी संसदेत ‘बॅक बेंचर’ होते, पण तरी वाजपेयींनी उपस्थित केलेले मुद्दे नेहरू अगदी कान देऊन ऐकायचे.
किंगशुक नाग त्यांच्या ‘Atal Bihari Vajpayee: A Man for All Seasons’ या पुस्तकात लिहितात की, एकदा भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांची वाजपेयी यांच्याशी भेट घालून देतांना नेहरू म्हणाले, “हे विरोधी पक्षातलं उगवतं नेतृत्व आहे. माझ्यावर नेहमी टीका करतात पण यांचं भविष्य उज्वल आहे.”
नेहरूंचा फोटो गायब
एकदा एका परदेशी पाहुण्यांसमोर वाजपेयींचा परिचय नेहरूंनी भावी पंतप्रधान असा करून दिला. वाजपेयी यांच्या मनात नेहरूंबद्दल अतिशय आदर होता.
किंगशुक नाग सांगतात,
1977 साली परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी पदभार स्वीकारण्यासाठी साऊथ ब्लॉक येथील कार्यालयात गेले. तेव्हा मंत्रालयातील नेहरूंचा फोटो गायब होता. अटलजींनी सचिवांना विचारलं, नेहरूंचा इथे असलेला फोटो कुठे आहे?
खरंतर वाजपेयी तो फोटो पाहून नाखूश होतील .असा विचार करून अधिकाऱ्यांनी तो फोटो तिथून काढून टाकला होता. वाजपेयी यांनी तो फोटो पुन्हा मूळ जागी लावण्याचा आदेश दिला. असं लक्षात आलं की भिंतीवरचा नेहरूंचा फोटो गायब आहे.
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, नेहरू ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीवर जेव्हा वाजपेयी बसले तेव्हा त्यांनी म्हटलं, “कधी स्वप्नात सुद्धा या खोलीत बसेन असं वाटलं नव्हतं.” परराष्ट्र मंत्री झाल्यावर त्यांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात फारसा बदल केला नव्हता हे उल्लेखनीय.
शक्ती सिन्हा यांनी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून काम बघितलं होतं. ते सांगतात की, सार्वजनिक भाषणांच्या वेळी वाजपेयी फारशी तयारी करत नसत, पण लोकसभेतल्या भाषणासाठी मात्र ते कसून अभ्यास करत.
सिन्हा सांगतात,”वाजपेयी संसदेच्या ग्रंथालयातून पुस्तकं, मासिकं, आणि वर्तमानपत्र मागवून घेत आणि आपल्या भाषणावर काम करत. ते मुद्दे काढत आणि त्यावर विचार करत. ते कधीच आपलं पूर्ण भाषण लिहित नसत, पण दुसऱ्या दिवशी लोकसभेतल्या भाषणाचा आराखडा त्यांच्या डोक्यात असायचा.”
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम