सद्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मोदी व शाहची जोडी कशी बनली?
अमित शाह व नरेंद्र मोदी यांची जोडी सद्याच्या घडीला भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवर जोडी आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास बघितल्यास असे लक्षात येते कि वेळो-वेळी अशा जोड्या भारतीय सत्तेचा हिस्सा राहिलेल्या आहेत व लोकप्रिय जोड्या बनून समोर आल्या आहेत.
गेल्या पाच ते सात वर्षात अशीच एक प्रभावी जोडी बनून नरेंद्र मोदी व अमित शाह हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे नेते समोर आले आहेत. देशातील शासनात केंद्रातील सर्वात महत्वाचे पंतप्रधानपद व गृहमंत्रीपद यांना ज्या अर्थी देण्यात आले आहे. त्यावरून त्यांचे महत्व लक्षात येते.
देशाच्या राजकीय इतिहासात महात्मा गांधी व नेहरू तसेच अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या जोड्या देखील तितक्याच लोकप्रिय होत्या. त्याचीच परंपरा मोदी आणि शाहच्या जोडीने कायम राखली आहे असे म्हणता येऊ शकते.
भारतीय जनता पार्टीचे हे दोन स्तंभ पहिल्यांदा ८० च्या दशकात भेटले होते त्यावेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.
अजून त्यांनी भाजपात प्रवेश केलेला नव्हता व अमित शाह पंडित दीनदयाल उपाध्याय संशोधन संस्थेच्या कोषाध्यक्षपदी रुजू झाले होते. तेव्हा पासूनच यांची भेट वाढत गेली. इथून त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. नरेंद्र मोदींनी अमित शहांची त्यावेळच्या गुजरात प्रदेशाध्यक्ष शंकर सिंग वाघेला सोबत ओळख करून दिली व त्या भेटीत अमित शहा बीजेपीचे कार्यकर्ता बनले.
काही काळातच नरेंद्र मोदी देखील बीजेपीत सहभागी झाले. गुजरात विधानसभेत बीजेपी सगळ्यात मोठा पक्ष बनला. त्यावेळी मोदी गुजरात बीजेपीचे महामंत्री होते व इथूनच मोदी आणि शाहच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर गुजरातमध्ये बीजेपीचे महत्व वाढवण्यात या दोघांचा सर्वात मोठा सहभाग होता.
गुजरात मधील गावागावापासून ते क्रिकेट असोसिएशन पर्यंत काँग्रेसला तगडे विरोधक उभे केले व प्रत्येक ठिकाणी त्यांनी पकड मजबूत केली.
यानंतर २००१ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. २००२ ची विधानसभा निवडणूक देखील बीजेपीने जिंकली. या निवडणुकीची जबाबदारी देखील मोदी व शाहवर होती.
२०१२ मध्ये मोदींनी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले या विजयासोबतच दोघांचे लक्ष केंद्राकडे वळले. हि जोडी नेतृत्वासाठी ओळखली जायचीच त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे नेतृत्व यांनी केले. त्या निवणुकांमधील बीजेपीच्या यशाविषयी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
या विजयानंतर बीजेपीने मागे वळून बघितले नाही. बघता-बघता बीजेपी सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला. व या पक्षाचे स्तंभ बनले अमित शाह व नरेंद्र मोदी. बीजेपीच्या या यशाचे बीज वाजपेयी आणि अडवाणी यांनी रोवले होते मात्र त्यांना पाणी घालून मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी व अमित शाहच्या जोडीने केले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम