लोकसभेत लोहिया पंतप्रधान नेहरूंना म्हणाले “प्रधानमंत्री यह मत भूलें कि वे नौकर हैं”
राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१० रोजी उत्तर प्रदेश मधील फैजाबाद मध्ये झाला. लोहिया यांचे वडील हिरालाल शिक्षक होते. याशिवाय ते महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. त्यामुळे ते अनेकदा महात्मा गांधी यांना भेटायला जात असत. तेव्हा त्यांच्यासोबत राममनोहर लोहिया पण जात असत. त्यामुळे लोहिया यांच्या विचारांवर महात्मा गांधी यांचा मोठा प्रभाव होता.
महात्मा गांधी यांच्या पासून प्रेरणा घेवून राम मनोहर लोहिया प्रभावित झाले. वयाच्या अवघ्या दहा वर्षापासून ते स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय झाले. १९३५ साली कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोहिया यांना कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले होते.
1940 मध्ये राम मनोहर लोहिया यांनी ‘सत्याग्रह अब’ हा लेख लिहिला होता. हा लेख लिहिल्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. पण यामागची खास गोष्ट म्हणजे, लोहिया यांना ज्या न्यायाधीशाने शिक्षा ठोठावली, त्याच न्यायाधीशाने लेखाचे कौतुक केले होते. पुढे डिसेंबर 1941 मध्ये त्याला तुरूंगातून सोडण्यात आले.
प्रचार न करण्याची शपथ घेणाऱ्या नेहरूंना लोहियांनी शपथ मोडायला लावली
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू फूलपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत होते. पंडित नेहरू त्यापूर्वीही १९५२ आणि १९५७ साली फूलपूर मतदारसंघातून निवडून गेले होते.
१९६२ सालच्या निवडणुकीत मात्र पंडित नेहरू यांनी ‘मी प्रचार करणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली.
पंडित नेहरू यांच्या या प्रतिज्ञेला समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी आव्हान दिले. डॉ लोहिया यांनी फूलपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. फॉर्म भरण्यापूर्वी लोकांनी त्यांना या जागेवरुन न उतरण्याचा सल्ला दिला होता.
तेव्हाची देशाची परिस्थिती पाहता निवडणुकीत नेहरूंचा पराभव करणे कठीण बाब होती. त्यामुळे डॉ. लोहिया यांनी दुसर्या जागेवरुन निवडणूक लढवावी, असे सर्वांचे मत होते. पण डॉ. लोहिया म्हणाले, “मला माहित आहे की माझा पराभव निश्चित आहे. पण विजय आणि पराभवाला अर्थ नाही. नेहरूंसारख्या खडकाला तडे जाणे हे माझे उद्दिष्ट आहे.”
डॉ. लोहिया यांनी नेहरूंच्या विरोधात अर्ज दाखल केल्यावर नेहरू म्हणाले होते, “तुम्ही माझ्याविरोधात मैदानात उतरलात हे चांगले झाले. पण मी वचन देतो, “मी मतदारसंघात एकदाही निवडणुकांच्या प्रचारासाठी येणार नाही.” पण मतदारसंघात लोहिया यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे अखेर नेहरूंना प्रचारासाठी जाव लागले होते.
….पंतप्रधान सभागृहाचे सेवक आहेत
१९६२ च्या भारत-चीन युद्धांत झालेल्या पराभवापासून देश पूर्णपणे सावरलेला नव्हता. याच विषयावर लोकसभेत चर्चा सुरु होती. डॉ. लोहिया त्याच वर्षी फर्रुखाबाद मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचले होते. देशाच्या पराभवाला तत्कालीन सत्ताधारी लोकांचे कमजोर मन कारणीभूत असल्याचे डॉ. लोहिया यांनी सांगितले.
लोकसभेत चर्चेवेळी पंतप्रधान नेहरू यांना त्यांनी प्रश्न विचारताना लोहिया यांनी विचारले की, “सरकारकडून असे कोणते परिपत्रक नव्हते का, ज्यामध्ये असे लिहिले गेले होते की, चीनच्या सैन्याशी टक्कर घेतलेल्या भारतीय जमिनीवर हानी होवू लागली तर ती जागा रिकामी करावी ?”
पुढे लोहिया यांनी आरोप केला कि, “बोमदीला भागात एकही गोळीबार झाला नाही, तरीही ती रिकामी करण्यात आली. फक्त रात्री थोडीशी चकमक झाली आणि आम्ही घाबरून मागे हटलो. जर ही मनाची कमजोरी नसेल तर मग काय आहे?
लोहिया यांच्या या गंभीर आरोपामुळे पंडित नेहरू उभे राहिले. त्यावेळी लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपणार होता. म्हणूनच नेहरू पुढे ढकलण्यापासून टाळण्यासाठी म्हणाले, ” मी या प्रश्नांचे उत्तर देणे म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासाची वेळ वाढवणे आहे”
डॉ. लोहिया यांना नेहरूंकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती, म्हणून त्यांनी रागाने म्हटले – “प्रधानमंत्री को सदन को जवाब देना ही होगा. प्रधानमंत्री यह मत भूलें कि वे नौकर हैं और सदन मालिक है. मालिक के साथ नौकर को अच्छी तरह बात करना चाहिए”
पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर अचानक अश्या प्रकारे झालेल्या टीकेमुळे कॉंग्रेस नेते खवळले. कॉंग्रेस नेते डॉ. भागवत झा आझाद यांनी उभे राहून लोहिया यांना विरोध केला. झा म्हणाले “ते नोकर आहेत, तुम्ही शिपाई आहात.”
झा यांच्यामुळे लोकसभेचे वातावरण अजून तापले. मग नेहरू लोकसभेच्या सभापतींकडे वळले आणि म्हणाले, “डॉ. लोहिया आपे से बाहर हो गए हैं। जरा उनको थामने की कोशिश कीजिए। ऐसी-ऐसी बातें कर रहे हैं जो इस सदन में नहीं कही जातीं” पंडित नेहरू यांच्या उत्तरावर लोहिया त्याच आवाजात पंडित नेहरूंना म्हणाले, “तुम्हाला माझी सवय लावावी लागेल. मी असाच राहील.”
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम