शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आला होता, माहित आहे का ?
१९७० सालच्या या निवडणुकीत शिवसेनचे निवडणूक चिन्ह होते “उगवता सूर्य”
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी घोषणा करून शिवसेना राजकारणात सक्रीय झाली. पण शिवसेनेचा पहिला आमदार कोण ? हाही प्रश्न तसा महत्वाचा ठरतो.
साल होत १९७०. परळचे तत्कालीन आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यांची हत्याच मुळात शिवसेनेकडून केली गेली, असे आरोपही तेव्हा केले गेले. आमदारांची हत्या झाल्यामुळे त्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.
कृष्णा देसाई यांच्या कम्युनिस्ट पक्षाकडून कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. त्यातच तेव्हाच्या नऊ राजकीय पक्षांनी त्यांना पाठींबा दिला होता. “कृष्णा देसाई यांची आठवण म्हणून शिवसेनाला मतदान करा” असे भावनिक आवाहन देखील केले गेले.
तर दुसरीकडे शिवसेनेने मात्र आपला वामनराव महाडिक यांना उमदेवारी दिली. तेव्हाचे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिक मधून
“महाराजांचा भगवा विधानसभेत गेलाच पाहिजे”
असा अग्रलेख लिहून बाळासाहेबांनी प्रचाराचा नारळ फोडला. १८ सप्टेबर १९७० रोजी बाळासाहेबांनी जाहीर प्रचारसभा घेवून प्रचारला सुरुवात केली. याच निवडणुकीत एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून तब्बल २८ जाहीर सभा घेतल्या गेल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठींबा
याच निवडणुकीत संघाचा शिवसेनाला जाहीर पाठींबा मिळाला होता.
संघाच्या वतीने मोरोपंत पिंगळे यांनी ‘साऱ्या हिंदुनी एक होवून शिवसेनेला मतदान करावे’ असे आवाहन केले होते.
शेवटी निवडणुकीचा निकाल लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या सरोजिनी कृष्णा देसाई यांना एकूण २९९१३ एवढी मते पडली तर वामनराव महाडिक यांना ३१,५९२ एवढी मते पडली. शिवसेना विजयी झाली आणि शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत गेला. तब्बल नऊ राजकीय पक्षांचा पाठींबा मिळूनही कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला.
उगवता सूर्य
१९७० सालच्या या निवडणुकीत शिवसेनचे निवडणूक चिन्ह होते “उगवता सूर्य” आणि खऱ्या अर्थाने याच निवडणुकीत राजकीय सूर्योदय झाला. एवढ मात्र नक्की !!
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम