Take a fresh look at your lifestyle.

छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती

बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती आणि ती घटना घडवून आणण्यामागे होते छगन भुजबळ.

0

सध्या राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांच्या अटकेनंतर मोठा संघर्ष सुरु झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे दिसते आहे.

असाच एक प्रसंग राज्याच्या राजकारणात घडला होता. त्यावेळी अटक झाली होती बाळासाहेब ठाकरे यांना आणि ती घटना घडवून आणण्यामागे होते छगन भुजबळ.

आज राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये सेना-राष्ट्रवादी सोबत सत्तेत आहेत. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा अटक झाली तेव्हा शिवसेना आणि भुजबळांमध्ये आजच्यासारखे सख्य नव्हते. तेव्हा सातत्याने शिवसेनेकडून भुजबळांवर बोचरी टीका केली जायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या अटकेमागे भुजबळच असल्याचे अनेकांचे मत होते.

काय होत प्रकरण?

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. मुंबईत १९९२-९३ साली झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते.

श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केली होती, असं भुजबळ एका मुलाखतीत म्हणाले होते.

२००० साली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. २४ जुलै २००० साली बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांची सुटका झाली.

अटकेमागचे कारण काय

सामनामध्ये चिथावणीखोर लेखन केल्या प्रकरणी बाळासाहेबांना कलम १५३ (अ) अंतर्गत अटक करण्यात आली होती. बाळासाहेबांबरोबर सामनाचे प्रकाशक सुभाष देसाई आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. पण या सर्वांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली.

बाळासाहेबांना अटक होणार म्हणून त्यावेळी मुंबईत प्रचंड तणाव होता. शिवसेना प्रमुखांना अटक झाल्याचे समजताच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात दुकाने बंद करण्यात आली होती. शाळा सोडून देण्यात आल्या होत्या.

प्रकरणानंतर भुजबळ यांचे स्पष्टीकरण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर मी फक्त स्वाक्षरी केली. ही फाईल आधीच्या सरकारच्या काळातील होती. त्यांच्या अटकेसाठी आपण कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. ही फाईल माझ्यासमोर आली तेव्हा गृहमंत्री म्हणून मी फक्त त्यावर स्वाक्षरी केली असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी केला होता.

१९९९मध्ये प्रचार सुरू केला, तेव्हा आमच्या वचननाम्यात श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असं म्हटलेलं होतं.

त्यानंतर १९९५ मध्ये युतीचं सरकार आलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरूद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. नंतर ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो.

त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. पण हा मुद्दा आता संपला आहे. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दंगलीबाबत मनोहर जोशी यांनी श्रीकृष्ण आयोग नेमला होता. युतीच्या काळात फाईल तयार झाली होती. मी फक्त सही केली. त्यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवणार नव्हतो. जर ते शक्य झालं नाही तर त्यांना मातोश्रीवर ठेवणार होतो. परंतु त्यांना त्रास द्यायचा नव्हता.

रमाबाईनगरमधील दंगलीत काही जणांच्या मृत्यूवरुन मी सरकार खुनी आहे, असा आरोप केला. त्यावेळी शिवसैनिकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. परंतु कोर्टात कोणाला ओळखत नाही, असं सांगत भुजबळ यांनी प्रकरण मिटवलं होत .

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.