तर यशवंतराव चव्हाण यांच्या ऐवजी भाऊसाहेब हिरे मुख्यमंत्री झाले असते
यशवंतराव चव्हाण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आणि त्यापूर्वी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झालेत. यात कोणालाही, कधीही आणि कुठलेच अतळ-अग्रुप वाटले नाही. इतिहास बदलत नसतो, बदलू शकत नाही. मात्र ठरवले तर प्रयत्नपूर्वक लपवला जावू शकतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबाबत तसं म्हणण्याची सोय आहे. महाराष्ट्राच्या अंतःकरणात यशवंतरावांनी दिलेल्या योगदानाचे प्रतिबिंब निश्चितपणे अंकीत आहे. मात्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन चळवळीच्या वस्तुनिष्ठ इतिहासाची पानं चाळली तर महाराष्ट्राची अस्मिता व आत्मस्वाभिमानास घेऊन पडद्याआडील बऱ्याच गोष्टींवर प्रकाशझोत पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणून भाऊसाहेब हिरे यांना बाजूला सारून यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, हे अर्ध सत्य असून त्यामुळे ते मनाला न पटणारे आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारावा, यासाठी माझे आजोबा भाऊसाहेब हिरे व त्यांच्या समकालीन प्रभूतींनी केलेला सर्वोच्च त्याग व समर्पण झाकोळले जाणार नाही, म्हणजेच चळवळीचा खरा इतिहास दृष्टीआड होणार नाही, याची म्हणूनच उचित दक्षता घेण्याची गरज आहे.
यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा भाऊसाहेब हिरे व समाज धुरिणांच्या त्यागामुळेच साकारला हेही, विसरता कामा नये.
त्यासाठी एकूणच संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचा वस्तुनिष्ठ इतिहास समजून घ्यावा लागेल. कारणः ह्या इतिहासातील घटनाक्रमातच चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासाचे इंगित दडलेले आहे !
मुळातच, तत्कालिन केंद्र सरकार व त्यातील अनेक दिग्गज हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा, यासाठी अनुकूल नव्हते. भाऊसाहेबांनीच बेळगाव येथे “संयुक्त महाराष्ट्र” या मराठी भाषिक प्रांताची कल्पना उचलून धरली व दि. २८ जुलै, १९४६ रोजी “संयुक्त महाराष्ट्र परिषद” ही सर्वपक्षीय संघटना जन्मास आली.
भाऊसाहेब काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस वर्कीग कमेटीपासून तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले. अशा परिस्थितीत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व व त्याची भूमिका हेच अंतिम सत्य ! पण भाऊसाहेबांनी प्रवाहाच्याविरुध्द जाण्याचा निर्णय घेतला आणि “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’ अशी उघड भूमिका घेतली.
सत्ता, पद, प्रतिष्ठापणाला लाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास त्यांनी अजिबात मागे पुढे बघितले नाही. कालौघात महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा लढा व त्याचा इतिहास विस्मृतीत गेला. एकीकडे भाऊसाहेब शीर्ष नेतृत्वाचे धोरण अव्हेरून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मागणीवर ठाम होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातीलच काही मंडळी या मागणीच्या विरोधात कार्यरत राहून शीर्ष नेतृत्वाचे अनुनय करण्यात आघाडीवर होती. काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन तट पडलेत.
भाऊसाहेब हिरे व त्यांचे समकालीन ज्यांनी “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीशी समजोता वा कुठलीही तडजोड कदापि शक्य नाही, असे प्रस्थापित नेतृत्वाला ठणकावलेच, पण उघड-उघड दंड थोपटले. निर्वाणीची भूमिका घेतली. मराठी मातीशी इमान राखले. १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि मगच तमाम मराठी जणांच्या अस्तितेचं प्रतिक असलेले आजचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास धगधगत्या ज्वालाकुंड समानच ! या इतिहासाच्या प्रत्येक पानातून त्या ज्वालामुखीची धग नेमकी कशी असेल ? हे समोर आल्याशिवाय राहत नाही. मराठी मातृभुमीविषयीची अगाध श्रध्दा, पराकोटीचा त्याग, अक्षरशः आपले अस्तित्वपणाला लावण्यासही ज्यांनी मागे पुढे पाहिले नाही, अशा कर्मवीर भाऊसाहेब हिरे व त्यांचे समवेत खांद्याला खांदा लाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात अग्रणी असलेल्यांचे बलिदान याच इतिहासातून दृष्टीक्षेपात येईल.
तरी ह्या इतिहासाची काही पाने काळीकुट्टही आहेत. दुःख वाटते, पण ही वस्तुस्थिती आहे. मराठी भूमीत असेही काही झारीतील शुक्राचार्य होते, की ज्यांनी मराठी माताशी संपूर्ण इमान न राखता राजकीय सौदेबाजी करणे पसंत केले. समकालीन समाजधुरिण व जनतेने हे बघितले, अनुभवले व जाणले. हा लढा म्हणजे तप्त अग्नीकुंड होते. समिधा अनेक पडल्यात. तरी दुसऱ्या बाजूने अंतस्थ विरोध, कारस्थाने, अडथळे अजुन काय-काय म्हणता येईल? अशा पध्दतीने मार्गात काटे पेरले गेलेत. पण शेवटी विजय मराठी मातृभूमीच्या सुपूत्रांचाच झाला. मनाला खोलवर जखम करणारी बाब म्हणजे ह्या मराठीवीरांचा हा त्याग, बलिदान विसरण्याचे पातक याच मराठी मातीत केले गेले. मन विषण्ण होते. मात्र, हाच इतिहास व हिच ती काही काळी पानं आहेत.
भाऊसाहेब हिरेंनी, संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रवाहाचे विरोधात उभे राहण्याची हिम्मत दाखविली. मात्र, तत्कालिन परिस्थितीत यशवंतराव चव्हाणांनी “महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे” अशी उघड भूमिका घेतली. हे नाकारता येत नाही, त्यांना सवाल केला गेला? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र वा नेहरूंपैकी तुम्ही कोणाची निवड कराल? तेव्हा त्यांनी आपला कौल नेहरूंच्या बाजूने दिला.
स्वतः पंडित नेहरूंनाही आपल्या सल्ल्याशिवाय यशवंतराव कुठलाही निर्णय घेणार नाही, याविषयी मनस्वी खात्री होती. स्वाभाविकपणे, संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर निर्घुण गोळीबाराचा आदेश देणाऱ्या मोरारजी देसाईंचा कलही यशवंतरावांच्याच बाजूने होता. यशवंतरावांच्या निष्ठेविषयी कोणतीही शंका घेता येणार नाही व निष्ठावंत कार्यकर्ता ही प्रतिमा कायम राखण्यात व संयुक्त महाराष्ट्र लढयात मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यातही ते पुढे यशस्वी ठरलेत, हेही येथे नमूद करणे क्रमप्राप्तच ठरते.
संयुक्त महाराष्ट्र समिती विशिष्ठ जणांची बटीक-दासी आहे, म्हणून हेटाळणी केली गेली. वैचारिक – जातीय मतभिन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. चळवळ खिळखिळी होईल, हे बघितले गेले. वस्तुतः चळवळीत भाऊसाहेबांबरोबरच आचार्य अत्रे, प्रबोधनकार केशवराव ठाकरे, भाई डांगे, शंकरराव देव, नाना पाटील, माधवराव बागलं, एस.एम.जोशी, सेनापती बापट आदि अनेक जण सहभागी होते.
तरी समितीतील काही मंडळींना बाजूला करण्यात, समितीला भगदाड पाडण्यात यशवंतराव चव्हाण हे यशस्वी ठरलेत. काहींना सत्तेची पदे दिली गेलीत. काहींना फक्त अमिषे दाखविली गेलीत. हे सर्व काही राजकारणाचा भाग म्हणून यशवंतरावांच्या कल्पकतेतूनच घडले. तरी या प्रयत्नांना अनेकजण बधले नाहीत, झुकले नाहीत. उलट चळवळीची धग वाढतच गेली. त्याच श्रेय भाऊसाहेब व वरील मंडळींना जाते. अशी ही वेळ आली की, एस.एम. जोशींनाच यशवंतरावांनी गळाला लावले. समितीतून बाहेर पडेल, त्याला राजाश्रय अशी सोय केली गेली. राजकारण म्हणून या गोष्टी अग्रुप विहीन असल्या तरी महाराष्ट्राचे यातून कोणतेही हित साध्य होणारे नव्हते. मात्र, श्री.यशवंतरावांचे राजकीय वजन यातून न वाढते तरच नवलं.
अन्यायाला आणि जुलूमशाहीला कदापि शरण जाणे नाही, वेळप्रसंगी मरण पत्करू, हाच तो महाराष्ट्र धर्म ! ३ कोटी मराठी माणसांची भावना अव्हेरून संयुक्त महाराष्ट्राची मागणी धुडकावून लावली गेली. विरोध असतांना द्विभाषिक राज्य लादले गेले. महाराष्ट्राने जे-जे मागितले ते शिर्ष सत्तेने नाकारले. मराठी माणसाच्या – महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला अव्हेरण्यासाठीची पराकाष्ठा सुरु होती. बेळगांव, निपाणी, कारवार, बिदर हा मराठी भाषिक मुलूख महाराष्ट्रापासून वेगळा केला गेला. आचार्य अत्र्यांच्या भाषेत, राक्षसी पक्षपात सुरु असतांना, झाडून सर्वच मराठी नेत्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेची राखण करणे आवश्यक होते, पण तरीही यशवंतराव चव्हाण या मागणीपासून व पक्षपाताविरोधात चार हात दुरच राहिले. स्वाभाविकच शिर्ष नेतृत्व यशवंतरावांचे बाबतीत अनुकूल होणारच !
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी मराठी माणसाची भावना अत्यंत संवेदनशिल असतांना छुपी व उघड कारस्थाने, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पातक, अक्षम्य अन्याय व उपद्व्याप करून ऐनकेन मुंबई महाराष्ट्रात राहू नये, असाच सगळा प्रवाह होता. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या चिंधडया उडविण्याचे मनसुबे रचले जात होते. पण यशवंतरावांसारखे नेते प्रवाहाच्या विरोधात जाण्यास तयार नव्हते आणि म्हणूनच प्रबल नेत्यांची महाराष्ट्रद्रोही म्हणून संभावना केली गेली. सन १९४८ पासून १९५६ च्या सप्टेंबरपर्यंत व त्यापुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापित होत नाही तोपर्यंत म्हणजे १ मे १९६१ पावेतो दरम्यान भाऊसाहेबांनी मुंबई महाराष्ट्रातच राहीली पाहिजे. यामागणीसाठी जेवढे कष्ट व त्याग करणे शक्य होते. तेव्हढे करण्याचा प्रयत्न केला. जीवनाची काही वर्षे या मागणी व आंदोलनातच घालविलीत.
दि. ३ डिसेंबर, १९५५ रोजी भाऊसाहेब हिरे श्री. शंकरराव देवांनाबरोबर घेऊन पूनः श्री.पंडीत नेहरूंना भेटले. मुंबईवरील महाराष्ट्राचा हक्क मान्य करा म्हणून विणवले, पण एकतर द्विभाषिक (विदर्भ वगळून) राज्य किंवा मुंबई शहर स्वतंत्र राज्य करून गुजरात, मुंबई महाराष्ट्र अशी त्रिराज्य योजना मान्य करा, असे पर्याय काँग्रेस श्रेष्ठींनी दिले.
या त्रिराज्य संकल्पनेविरुध्द मुंबई राज्य विधानसभेत भाऊसाहेबांनी सूचना मांडली, ती २४२ विरुध्द २८ असे मतदान होऊन मंजुर झाली.
२२ डिसेंबर, १९५५ रोजी मुंबई महापालिकेने देखील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला बहुमताने पाठींबा दिला, तरीही दि. १६ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत येऊन पंडीत नेहरूंनी त्रिराज्य योजना जाहिर केली, तर मुंबई शहर केंद्र शासीत प्रदेश करण्यासंबंधीचा निर्णय याचवेळी आकाशवाणीवरून नेहरूंनी जाहिर केला. त्यामुळे संतापाची एकच लाट पसरली व दंगल उसळली. अनेक निरपराध, माणसं मृत्युमुखी पडली. भाऊसाहेब अतिशय सहनशिलवृत्तीचे होते. सामोपचाराने तोडग्यासाठी, ते अथक जीवापाड प्रयत्न करत होते. शिर्ष नेतृत्व मागणी मान्य करत नाही व राज्यात उघड-उघड दोन तट निर्माण झालेले, त्यामुळे अखेर
भाऊसाहेबांनी मंबईसह संयुक्त महाराष्ट्र मागणीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाऊसाहेबांच्या ह्या पावलामुळे त्यांचेविषयी मराठी जनतेत जबरदस्त प्रेम व सहानुभूतीची लाट आली, ते महाराष्ट्रीयन जनतेच्या हृदयात विराजमान झालेत.
दि.१ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झालेत खरे पण, मोरारजी देसाईंच्या गर्वहरणा नंतरच त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकली. ते कसे हे समजून घ्याः केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना एकत्र आणून द्वैभाषिक राज्याची स्थापना बळजबरीने केली, मोरारजी देसाई या राज्याचे मुख्यमंत्री होते. मराठी जनता या निर्णयामुळे संतापलेली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीची राज्यात परिस्थिती चांगली होती. अशातच १९५७ मध्ये विधानसभा निवडणूका झाल्यात. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस भुईसपाट झाली.
समिती तसेच घटक पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात तर फक्त भाऊसाहेब हिरे हेच काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेत. तरी मोरारजी देसाईमुळे द्वैभाषिक गुजरातेत काँग्रेसला जादा जागा मिळाल्या, व एकूणच बहुमतही मिळालं. काँग्रेसला ३९६ पैकी २३४ जागा मिळाल्या. मोरारजी देसाईंनी त्यांची काँग्रेस गटनेतेपदी बिनविरोध निवड व्हावी, अशी अट ठेवली. मोरारजी अविरोध मुख्यमंत्री होतील असेच चित्र होते.
महाराष्ट्र द्रष्टे मोरारजी पूनः मुख्यमंत्री होणे महाराष्ट्रप्रेमी भाऊसाहेबांना मान्य नव्हते, म्हणून मुंबईसह मराठी भाषिकांच स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी उघड भूमिका घेतलेल्या भाऊसाहेबांनी काँग्रेस गट नेतेपदाच्या निवडणूकीत उडी घेतली. मोरारजी देसाईंनी आपला पराभव निश्चित आहे, हे पाहून नेते पदाच्या शर्यतीतून अकस्मात माघार घेतली व यशवंतराव चव्हाणांच नांव पुढे केलं.
भाऊसाहेबांनी “महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस मोठी व काँग्रेसपेक्षा नेहरू मोठे” असे सांगणाऱ्या चव्हाणांसमोर कडवे आवाहन उभे केले. ही लढत मोठी अतीतटीची होईल, असेच चित्र होते, पण मोरारजींनी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली आणि आपले प्रभुत्व सर्वशक्तीनिशी वापरून गुजरातेतील सर्व आमदारांचे पाठबळ यशवंतराव चव्हाणांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच ही अत्यंत चुरशीची लढत यशवंतराव जिंकु शकले. नाही तर यशवंतराव मोरारजी देसाईंचे पाईक होते.
मोरारजी चव्हाणांच्या मदतीला गुजरातेतील आमदारांची शिदोरी घेऊन उभे ठाकले. नसते तर भाऊसाहेबांचा मार्ग अती प्रशस्त होता.
तरी त्यानंतरही यशवंतरावांनी आपल्या भुमिकेत यत्किंचित बदल होऊ दिला नाही. तर भाऊसाहेबांनी सुध्दा स्थितप्रज्ञ राहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी व लढा सुरुच ठेवला. अखेर केंद्र सरकारला जनमताच्या रेटयापुढे झुकावेच लागले. शिर्ष नेतृत्वाच्या अखंड अनुनयांची बक्षिसी, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीपद!
जे यशवंतरावांना आपसुकच मिळाले, भाऊसाहेबांनी तत्वाशी तडजोड केली असती, प्रवाहाच्या विरोधात भूमिका घेतली नसती. मोरारजींना विरोध केला नसता, शिर्ष नेतृत्वाच्या कलेने घेतले असते, तर १९५७ व तद्नंतर पुढे १९६१ मध्ये कदाचित राज्यातील सत्ता सोपानाचे चित्र वेगळे राहिले असते. त्यामुळे भाऊसाहेब हिरेंना बाजूला सारून, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झालेत, हे अर्धसत्य आहे ! चव्हाण मुख्यमंत्री जरूर झालेत, पण त्याची कारणे व पार्श्वभुमी वरीलप्रमाणे असून ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात दडलेली आहेत.
- डॉ. प्रशांत व्ही. हिरे.
- लेखक भाऊसाहेब हिरे यांचे नातू आणि माजी मंत्री आहेत
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम