Categories: Uncategorised

स्त्रीजीवनाचा कॅलीडोस्कोप

कॅलीडोस्कोप !!  बघणाऱ्याच्या   दृष्टिकोनानुसार, प्रकाशाच्या उपलब्धेनुसार आणि त्या कॅलीडोस्कोप मध्ये असलेल्या काचेच्या तुकड्यांच्या रंगसंगतीनुसार वेगवेगळे पॅटर्न तयार होतात. जसा फिरवू तसा “दृष्टिकोन ‘ बदलत जातो आणि जे दिसतं ते त्या “कोनावर”  अवलंबून असतं, त्यात झिरपणाऱ्या प्रकाशावर अवलंबून असतं आणि बघणाऱ्याच्या सौंदर्य दृष्टीवर सुद्धा !! एखाद्या अंधाऱ्या खोलीत फिरवला तर काय पॅटर्न दिसतात? सकाळच्या उन्हात,  संधिप्रकाशात काय पॅटर्न दिसतात आणि त्याला एखादा तडा गेला तर काय पॅटर्न दिसतात? केवढी ती विविधता ! तीन आरसे, काही काचांचे तुकडे, प्रकाश आणि दृष्टिकोनाचा सगळा खेळ !! ह्यातून प्रकाश आणि दृष्टिकोन ह्या दोन गोष्टी वजा केल्या तर काय उरतं? फक्त तीन आरसे आणि काही काचेचे तुकडे ! त्याचं काय कौतुक? काहीच नाही .

स्त्रीजीवन पण असंच… ह्या कॅलीडोस्कोप सारखं !! वेळेनुसार, काळानुसार, गरजेनुसार, समाजाच्या दृष्टिकोनानुसार  आणि ज्ञानाच्या, बुद्धीच्या प्रकाशानुसार बदलणारं!! स्त्री असणं किंवा स्त्री म्हणून जन्माला  येणं ही तशी  खूपच नैसर्गिक आणि सहज गोष्ट!! जसा ऋतुचक्रानुसार पाऊस पडतो, झाडं वाढतात, फुलं फुलतात, प्राणी-पक्षी जन्माला येतात अगदी तितकंच सहज असतं कोणत्याही मनुष्यप्राण्याचं जन्माला येणं. पण खरंच ते तितकं नैसर्गिक आणि सहज राहतं का?  आपण त्या नैसर्गिक सहजतेला जगू देतो का ? की आपल्या मानवनिर्मित श्रद्धा , विचार आणि विश्वासांनी त्याचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करतो ? त्याला साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो ??  ह्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रत्येकानी स्वतःला द्यायची. कारण आयुष्यात आपल्या प्रश्नांची सगळ्यात जास्तं प्रामाणिक उत्तरं आपण स्वतःलाच देत असतो .

स्त्रीत्व म्हंटलं तर किती साऱ्या गोष्टी मनःपटलावर येऊन उभ्या राहतात…. काळानुसार, प्रथेनुसार, भूमिकेनुसार, गरजेनुसार, समाजानुसार आणि स्वतःच्या आकांक्षांनुसार बदलत जाणारं स्त्रीत्व.. आदिशक्तीपासून अगदी आज जन्माला आलेल्या चिमुकल्या जीवापर्यंतचा प्रवास !! काहीसा हवासा, काहीसा नकोसा वाटणारा… कधी हळुवार तर कधी प्रखर…  भावनांचा तर कधी बुद्धीचा…  आकांक्षांचा तर कधी कर्तव्यांचा !! प्रत्येक स्त्रीमध्ये दररोज स्त्रीत्व नवीन जन्म घेत असतं… उमलत असतं… उमगत असतं… धडपडत असतं… स्वतःला आणि आजूबाजूच्या जगाला रोज नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं… कधी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगाकडे पाहत असतं तर कधी परिघावर राहून जगाला जाणून घेत असतं. कधी स्वच्छंद तर कधी भिडस्त!! कधी आपल्यापुरतं सावरणारं तर कधी विश्वाला सामावून घेणारं !! कधी अंतर्मुख तर कधी व्यक्तं !! कधी स्वतःचा अभिमान वाटणारं तर कधी स्त्री नसल्याचा हेवा करणारं ! आणि ह्या सगळ्या गदारोळात सुद्धा सौंदर्य आणि सृजन  जपणारं!!

समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्यापेक्षा स्त्रियांचा स्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे मला अधिक महत्वाचं वाटतं . कारण तो दृष्टिकोन स्त्रीचं भवितव्य ठरवतो . स्त्रीच्या नजरेत ‘ स्त्रीत्व काय आहे?’ किंवा ‘ स्त्री काय आहे ?’   हे जर स्पष्ट असेल तर बाकी कोणालाच स्त्री सबलीकरण वगैरे प्रकरणात पडायची गरज पडत नाही . जेव्हा तो दृष्टिकोन सुद्धा स्त्रिया स्वतः निवडत नाहीत तेव्हा खरंच कठीण वाटतं मला !! ‘ स्त्रीवाद ‘ , ‘ स्त्री सबलीकरण ‘ ‘ पुरुषप्रधान संस्कृती ‘ हे खूपच ‘ प्रदूषित ‘ झालेले शब्द !!  प्रत्येकाने आपापल्या सोयीने , सोयीपुरती आणि सोयीसाठी त्यात भेसळ केली . त्यामुळे ह्या लेखापुरते ते  बाजूलाच बरे !! पण स्त्रीच्या नजरेतून स्त्रीजीवनाचा कॅलीडोस्कोप कसा दिसतो त्याचं मला कायमच कुतूहल !!

माझी आजी नेहमी म्हणायची ‘मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहू द्या आधी . नंतर लग्न बिग्न !!’ , आई म्हणायची ‘मुलींना त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडू द्या’ हा केवळ एका आजीचा आपल्या नातींकडे बघण्याचा किंवा एका आईचा आपल्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन नव्हता हा त्या दोन स्त्रियांचा ‘ स्रीत्वाकडे ‘ बघण्याचा दृष्टिकोन होता. कॉलेज मध्ये असताना आर्मीमध्ये जायचं म्हणून एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडे मार्गदर्शनासाठी गेले. ते म्हणाले ‘ मुलींनी आर्मी मध्ये नाही गेलं पाहिजे. It is not good to send a cat amongst wild dogs ‘ माझ्याही नकळत मी त्यांना विचारलं ‘ What if the cat is equally wild ? ‘ .. ते हसले आणि  म्हणाले  ‘ then you  must join’. आता जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की तो एका पुरुषाचा आणि एका स्त्रीचा स्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता.

 वयाच्या आठव्या वर्षी झालेल्या  ‘बलात्काराचा बळी’ ही ओळख पुसून जेव्हा डॉक्टर सुनीता कृष्णन ‘ प्रज्वला ‘ नावाची संस्था काढून मानवी तस्करीच्या विरोधात उभ्या राहतात ,  व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या विरोधात काम करतात . त्यासाठी नेल्सन मंडेला -ग्रासा माशेल इंनोव्हेशन  अवॉर्ड त्यांना दिला जातो . तेव्हा पुन्हा एकदा स्त्रीचा स्रीत्वाकडे, स्त्रीजीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन समोर येतो .

 ‘ जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला .
जरी अश्रू विस्फोट होऊनी सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला .’

 चाणक्य मंडळाच्या प्रार्थनेतील ह्या ओळींचा प्रत्यय देतो.

जेव्हा ‘ फक्त पुरुषांसाठी ‘ असं लिहिलेल्या नोकरीच्या जाहिराती संदर्भात  निषेध व्यक्तं करणारं पत्रं सुधा मूर्ती जे. आर. डी. टाटांना पाठवतात आणि त्यानंतर त्या पत्राची दखल घेवून त्याकाळच्या Telco चे अधिकारी त्यांना मुलाखतीसाठी बोलावतात आणि नोकरीसुद्धा देतात तेव्हा सुधा मूर्ती नावाच्या स्त्रीच्या स्रीत्वाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे Telco नावाच्या कंपनीचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. झिरो फिगर च्या जमान्यात जेव्हा गरोदर असताना करीना कपूर सभ्यसचीच्या रॅम्पवर चालायचा निर्णय घेते तेव्हा तो तिचा स्त्रीच्या मातृत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो .  स्वतःच्या जाडीबद्दल विद्या बालन जेव्हा अपराधीपणाची भावना ठेवत नाही आणि ” सो व्हॉट ? ” असा प्रतिप्रश्न करते तेव्हा असंख्य स्त्रियांचा स्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो .

‘Vaginal Monologue’ नावाचं नाटक किंवा मराठीतील त्याचा अनुवाद ‘ योनीच्या मनाच्या गुजगोष्टी ‘  जेव्हा दोनशे स्त्रियांचं योनीबद्दल मत जाणून घेते तेव्हा दोनशे वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. देशाच्या पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या  बेनझीर भुट्टो आणि  न्यूझीलंडच्या  जेसिन्डा  आर्डेर्न मातृत्व स्वीकारतात. त्यापैकी बेनझीर दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये पोहोचते आणि जेसिन्डा  आर्डेर्न मातृत्व रजा घेते. समान परिस्थितील दोन वेगवेगळे दृष्टिकोन स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून निभावण्याचे !! ‘मिशन मंगल’ चित्रपटात दाखवलेल्या तारा शिंदे(विद्या बालन ), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा) , कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू ) , वर्षा पिल्लई (नित्या  मेनन ) , नेहा सिद्दीकी (कृती कुल्हारी ) ह्या वैज्ञानिक स्त्रीजीवनाचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर उभे करतात . जैत रे जैत मधल्या स्मिता पाटील पासून , मदर  इंडिया मधली नरगिस , अस्तित्व मधली तब्बू !! रामायणातल्या  सीता , कैकेयी , मंथरा , शबरी , अहल्या !! महाभारतकाळातल्या  कुंती , गांधारी , द्रौपदी , राधा , रुक्मिणी !! जिजाबाई , ताराबाई , काशीबाई , मस्तानी !! मीराबाई , मुक्ताई !! प्रत्येकीचा स्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा !! प्रत्येकीची कथा वेगळी ! प्रत्येकीचा आनंद वेगळा ! संघर्ष वेगळा ! आणि प्रत्येकीला  सन्मानही  वेगळा !

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते , रमन्ते  तत्र देवता ‘ म्हणणाऱ्या संस्कृतीत जन्म घेतलेले आपण !! नक्की कोणत्या स्त्रीला पुजतो आपण ? कशाप्रकाराचं स्त्रीत्व आदरणीय , सन्माननीय वाटतं आपल्याला !! आपल्या साच्यात बसणारं ? आपल्या दृष्टिकोनातून ‘योग्य ‘ ठरणारं ? आपल्याला मान्य असणारे कपडे घालणारं ? आपण ज्याला संस्कृती ठरवतो त्या संस्कृतीच्या व्याख्येत बसणारं की संस्कृतीतल्या कल्पकतेला, वैविध्याला आत्मसात करणारं? कॅलीडोस्कोप मध्ये जे पॅटर्न असतात त्यातलं नावीन्य आपल्याला चालतं का ? आवडतं का ? झेपतं का ? उमजतं का ?

स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या जीवनाकडे पाहायला किती स्त्रिया तयार असतात ? किती कर्तृत्ववान स्त्रिया आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या , कमी कमावणाऱ्या , कमी उंचीच्या किंवा कमी संपत्ती असलेल्या पुरुषाशी लग्न करायला तयार होतात? किती स्त्रियांना घर सांभाळणारा नवरा चालतो ? आणि ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर त्याची कारणं काय? माझा एक मित्र आर्मीमधून बाहेर पडला आणि उच्च शिक्षणासाठी त्याला काही वर्ष द्यायची होती. पत्नी नावाजलेल्या कंपनीत खूप चांगला पगार कमवत होती .” बायकोच्या पगारावर जगतोय ” हे टोमणे ऐकायला लागतील म्हणून तो नोकरीला लागला . ज्याप्रमाणे स्त्रिया करिअर ब्रेक घेऊ शकतात तसे किती पुरुष घेऊ शकतात ? किती स्त्रिया त्याला मान्यता देतात ?  नवरा व्यसनाधीन आहे म्हणून पर्याय नसल्याने घराची जबाबदारी घेणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत पण पती पत्नी दोघांनी ठरवून वरील निर्णय घेणारे किती ?

स्त्रीत्व हे फक्तं शारीरिकच नाही . जी भारतीय  संस्कृती  शारीरिक लिंगभेद न करता ‘प्रकृती’ (feminine )  आणि पुरुष(masculine ) हे प्रत्येक  व्यक्तीमध्ये असतात हे सांगते , त्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारे आपण पुरुष म्हणून जन्माला आलेल्या शरीरातील ‘प्रकृती’ (feminine) ला न्याय देतो का ? व्यक्तं होऊ देतो का? ‘नटरंग’  चित्रपटातील धिप्पाड पैलवान असलेला गुणा(अतुल कुलकर्णी) कलेसाठी आणि कलेच्या प्रेमासाठी तमाशात नाच्या बनतो  तेव्हा त्याच्या कलेचं कौतुक वाटणारे किती आणि एक पैलवान नाच्या बनला म्हणून हळहळणारे किती ? स्त्री मधील पुरुषी (masculine) गुणांना वापरून उंची  गाठणाऱ्या स्त्रियांना सत्कारमूर्ती बनवणारे आपण , तिच्यातील प्रकृतीला तेवढाच न्याय देतो का ?  शारीरिक स्त्रीत्वाच्याही पुढे जाऊन  स्त्रीगुणांचा विचार आणि आदर करायला आपण तयार आहोत का ?

  • कॅप्टन  स्मिता गायकवाड

पारंबी दिवाळी अंक

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.