Categories: गावगाडा

कुंपणाबाहेरचा समाज

आपण माणसं नेहमी समाज – समाज करत असतो. पण या समाजात आपण फक्त स्त्री आणि पुरूष असंच आणि एवढंच विभाजन करत असतो. खरंतर घरातून, शाळेतून लहापणापासूनच आपल्याला समाज म्हणजे स्त्री – पुरूष हेच समीकरण शिकवलं जातं. या बेरजेत आपण आजही तृतीयपंथीयांना घ्यायला विसरतो. त्यातही एकवेळेस आपण दुसऱ्याच्या घरातल्या एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकारू शकतो. पण स्वत:च्याच घरात ती व्यक्ती असेल तर तो आपल्या मानहानीचा, लज्जेचा विषय ठरतो.

एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला आपण तोंडावर दाखवण्यासाठी आदर देतो. पण त्यांच्याच मागे त्यांच्या ‘असण्यावर’ आपण हसत असतो आणि मी असं म्हणू शकते. कारण मी अशा अनेक हसणाऱ्या लोकांना बघितल आहे. अर्थात याला काही अपवाद देखील असतात. काही लोक खरंच मनापासून त्यांना आदर देतात. पण तृतीयपंथीयांना या पुर्ण समाजाकडून आदर, सन्मान हवा असतो.

आपल्या समाजात स्त्री – पुरूष या दोनच गटांच अस्तित्व मनातून स्वीकारल आहे. कारण निर्सगाने स्त्री आणि पुरूष या दोनच सुंदर कलाकृती बनवल्या आहेत, असं आजवर आपल्या मनावर बिंबवल गेलं आहे. त्यामुळे तृतीयपंथी समाज ही सुद्धा निसर्गाची एक सुंदर कलाकृती असू शकते हे आपलं बुरसटलेलं मन मान्यच करत नाही. त्यामुळे आपल्या समाजात तृतीयपंथीयांबद्दल फार अज्ञान आहे. आपल्याकडे हिजडा म्हणजे काय हे लोकांना विचारलं तर त्यांना फक्त इतकंच माहीती असतं की , एक पुरूष असतो जो बाईसारखं वागतो. LGBTQ वर जर मी माझ्या काही उच्चशिक्षित मित्र मैत्रिणींना विचारलं तर त्यांचा प्रश्न असतो, ‘ते काय असतं ?’

खरंतर मलाही तृतीयपंथी समाजाबद्दल माहिती नव्हती. पण जेव्हा माणूस या शब्दाचा अर्थ कळायला सुरूवात झाली तेव्हा हिजड्यांबद्दल समाजात असलेल्या गैरसमजुतींनी माझ्या मनात प्रश्नांची गोल गोल वर्तुळं बनत गेली आणि त्या वर्तुळांमधून बाहेर पडण्यासाठी मी उत्तरं शोधत गेले.

मी बालपणी मामाकडे, एका खेडेगावात असल्यामुळे ” हिजडा ” हा शब्द म्हणजे नक्की काय हेच माहीत नव्हते. मला वाटायचं की हिजडा ही एक प्रकारची शिवी आहे. पण आज थोडी अक्कल आल्यामुळे कळतंय की ती काही शिवी नाही, तर कित्येकांच्या अस्तित्वाची ती एक ओळख आहे. कित्येकांचं आयुष्यं त्या तिन अक्षरांच्या एका शब्दाने बांधून घेतलंय. पण लहानपणीच्या निरागस अज्ञानाने या शब्दामागे मी जी काही प्रतिमा तयार केली होती ती अशी की, मला वाटायचं ‘हिजडा’ म्हणजे जुन्या मराठी चित्रपटातल्या दरोडेखोरांसारखंच काहीतरी भयानक प्रकार असणार हा. कारण मी त्यांच्याबद्दल हेच ऐकलेलं की ते वाईट असतात. ते आपल्याला त्रास देतात. आपल्या कडून जबरदस्तीने पैसे घेतात. आणि नाही दिले तर शाप देतात. त्यांना सगळे घाबरतात. त्यामुळे खेड्यातल्या अज्ञानी लहान मेंदूने ‘हिजडा’ या शब्दाची अशीच कल्पना करणं हे साहजिकच होतं.

त्यानंतर मी आठवीला माझ्या आईकडे आले आणि हडपसरला शाळेत जायला लागले. नवीन नवीन मला कुणीच मैत्रिणी नव्हत्या. त्यामुळे स्कुल बसमधे मी बस भरेपर्यंत एकटीच शांत बसलेली असायचे. तेव्हा मला रोज काही भडक मेकअप केलेल्या, आणि जरा अंग दिसेल अशी साडी घातलेल्या बायकां रस्त्याच्या पलिकडच्या बाजूने जाताना दिसायच्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या थोड्या वेगळ्या जरी वाटत असल्या तरी त्यांना पाहून मला कधीच हसायला आलं नाही. किंवा कधीच त्यांची भिती किंवा घाण वाटली नाही. पण रस्त्यावरची आसपासची दुसरी माणसं मात्र त्यांच्यावर मागून हसायची. विचित्रपणे त्यांच्याकडे बघायची. पण त्याचं कारण काही मला कळायचं नाही.

नंतर मला एक मैत्रीण झाली बसमधे तेव्हा तिच्याकडून कळलं की त्यांना हिजडे म्हणतात. आणि ते वाईट असतात. आणि त्यांच्यापासून आपण लांब रहायचं. माझा या गोष्टींवर कधी विश्वासच बसायचा नाही. पण त्यांच्याबद्दल कधी कोणी चांगलही बोलायचं नाही. एकदा तर आमच्या एका सरांनी सुद्धा सांगितलेलं की ते लोक चांगले नसतात. पण तरी माझं मन काही त्यांचं वाईट असणं स्विकारायचं नाही.

त्यानंतर मी दहावीला गेल्यावर स्कूल बस सोडली आणि माझ्या मैत्रिणींसोबत P.M.T बसने यायला जायला लागले. तेव्हा जवळपास रोज बसमधे एक तरी हिजडा असायचाच. तेव्हा त्यांच्या शेजारी सीटवर बसायलाही लोक नाक मुरडायचे. आणि त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत बघायचे. एकदा तर काय झालं, एका संध्याकाळी आम्ही सगळ्यां मैत्रिणी शाळेतून घरी जात असताना, आमच्यातल्या एका मैत्रिणी शेजारी आणि तिच्या पुढच्या सीटवर असे तीन हिजडे येऊन बसले. ते त्यांच्या त्यांच्या नादात होते. पण आमची ती मैत्रिणी मात्र खुप रडायलाच लागली. ती इतकी घाबरली होती की उतरल्यावर ती थरथरायला लागली.

खरंतर माझ्या बाकीच्या मैत्रिणी त्यांना पाहून अशा रडत नसल्या तरी त्या पण हिजड्यांना खुप घाबरायच्या. आणि आम्ही सगळ्यांजणी बसमधे उभं राहून जायचो पण कुणीच कधीच त्यांच्याशेजारी सीटवर बसायचो नाही.

त्यानंतर काही महिन्यांनी असंच एकदा सकाळची शाळा होती. म्हणून आम्ही मैत्रिणी 6 च्या p.m.t बसमधे चढलो. बस पुर्ण भरलेली, दोन – तीन जणं उभे होते. आणि तेवढ्यात मला बसमधे सर्वांत पुढच्या सीटवर एक जागा दिसली, तशी मी घाईघाईने तिथे जाऊन बसले. ते जुन्या बसमधे समोरासमोर सीट्स असतात ना, तिथे! थंडीचे दिवस सुरू झालेले. त्यामुळे खुप धुकं पडलेलं. पहाटेच्या त्या अंधारात समोरच्या सीटवर एक बाई आडवी झोपलेली मला दिसली. तिने साडीने स्वत:ला गुंडाळून घेतलेलं. मधे मधे ती हालचाल करत होती. मला वाटलं की आजारी असेल. थोड्यावेळानं जरा उजेडलं तेव्हा ती बाई मला नीट दिसली. तिला पाहून मला खुप कसंतरी झालं. माझ्या पोटातच गोळा आला. कारण तिची पुर्ण साडी रक्तानं भरलेली. तिचा चेहरा, हात सगळ सुकलेल्यां रक्ताने बरबटलेलं. तिला खुप लागला होतं. पण तिचा अपघात झाला असेल असं अजिबात वाटत नव्हतं. तिला नक्कीच कोणीतरी खुप मारलं होतं. नंतर तिचा चेहरा नीट पाहिल्यावर मी मनात म्हणलं, ‘अरे हा तर तो हिजडा आहे, जो रोज मला कुठे ना कुठे या प्रवासात दिसतो .’ मग मला कळलं की हे सीट रिकामं का होतं. मी तिच्या अंगावरच्या त्या सुकलेल्या रक्ताकडे बघत बसले होते. तेवढ्यात हडपसर आलं. आणि कंडक्टरने अगदी निर्दयीपणे, रागात तिला बसमधून उतरायला लावलं. तिला नीट उतरताही येत नव्हतं. तिचा सारखा तोल जात होता. मला वाटलं तिला धरावं. तिला विचारावं काय झालंय? तुझ्या अंगावर एवढं रक्त का आहे ? मी तिच्या पाठोपाठ उतरले आणि तिच्या जरा जवळ जाऊन उभं राहीले. पण माझी हिंमतच होत नव्हती तिच्याशी बोलायची. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीही उतरल्या आणि मग आम्ही आमच्या शाळेकडे निघालो. त्यादिवशी माझं दिवसभर शाळेत लक्ष लागलं नाही. कारण मला तिच्याशी बोलायचं होतं. तिची मदत करायची होती. पण आपण समाजाला कधी कधी इतकं घाबरतो ना की खुप चांगल्या गोष्टी करायच्याच सोडून देतो. आजही हा प्रसंग मला नीट आठवतो. कारण तो हिजडा मला आजही कधी कधी दिसतो.

त्यांतर पुन्हा काही दिवसांनी एकदा मी आणि माझे वडील बसस्टाँपला चालत चाललो होतो. तेव्हा अचानक माझ्या वडिलांनी ‘ अरूण ‘ अशी हाक मारली. मी त्या दिशेने पाहीलं तर तिथल्या एका दुकानातून एक हिजडा आमच्या दिशेने हसत आला. आणि माझ्या वडीलांशी बोलू लागला. दोन चांगल्या मित्रांसारखं त्यांच्यात बोलणं सुरू होतं. माझ्या वडीलांनी माझी पण त्याच्याशी ओळख करून दिली. नंतर तो निघून गेला.तो गेल्यावर मी वडीलांना विचारलं की तुम्ही त्याच्याशी का बोललात ? ते खुप वाईट असतात ना ? सगळे त्यांना घाबरतात. तर ते बोलले, ‘ अगं, ते आपल्यासारखेच असतात. चांगले असतात. त्यांना काय घाबरायचंय…’ माझ्या वडिलांच्या या वाक्यांनी माझ्या मनाला आयुष्यभरासाठी जिंकून घेतलं होतं. कारण मला हिजड्यांबद्दल जे वाटत होतं , ते त्यांना सुद्धा वाटत होतं म्हणजे असा विचार करणारी मी एकटी नाहीये, ही जाणिव मला त्यावेळी खुप गरजेची होती, असं मला नेहमी वाटतं. तेव्हापासून तृतीयपंथी समाजाबद्दलच्या माझ्या दृष्टीकोनाचा मी स्वत: स्विकार केला. इतके दिवसांपासून माझा आतला आवाज आणि बाहेरच्या जगाची मतं यांच्यात जे युद्ध सुरू होतं ना, त्याचा निकाल त्याक्षणी लागला होता. आता ‘हिजडा’ या शब्दाबद्दल कुणाची काहीही मतं असली तरी माझी मतं क्लिअर होती. पण हो, काही प्रश्न होतेच. जसे की ते काम करायचं सोडून पैसे का मागतात ? ते कुठे राहतात ? त्यांच्या कुटूंबाविषयीचे अनेक प्रश्न उत्तराविना तसेच मनात पेंन्डिंग होते. तेव्हा माझ्याकडे इंटरनेटवाला मोबाईल नव्हता, त्यामुळे google हे out of coverage area च होतं. आणि कुणालाच त्यांच्याबद्दल फार काही माहीत नसायचं. कारण आपल्याकडे आजही कुणी किती शिकून पुढे गेलं तरी तृतीयपंथी समाजाबद्दल सगळा अंधारच असतो. एकतर त्यांच्याबद्दल फार विचार करण्याची कुणाला गरजच वाटत नाही. कारण आपल्याकडच्या so called समाजाच्या कुंपनात आजही फक्त ‘ स्त्री आणि पुरूष ‘ यांनाच यायची मुभा असते. तृतीयपंथी समाजाला अजूनही पद्धतशीरपणे या कुंपनाच्या बाहेरच ठेवलं जातं. तरी आता यात थोडासा बदल व्हायला सुरूवात झालीये. कायद्याने त्यांना स्वीकारल्यामुळे त्यांच्यात तेवढा आत्मविश्वास आलाय की ते आता स्वत:च्या अस्तित्वासाठी या समाजात हक्काची जागा निर्माण करत आहेत. पण कायद्यालाही त्यांना स्विकारायला तसा बराच उशीर लागला.

2014 सालची गोष्ट, एका सकाळी मी पेपर वाचत होते, तेव्हा पेपरच्या एका कोपऱ्यात एक छोटी बातमी होती की, ” तृतीयपंथी समाजाला आतापासून एक ‘तृतीयपंथी’ म्हणून मतदानाचा अधिकार आहे. ” ही बातमी वाचून मला धक्काच बसला. कारण त्यांना इतके दिवस मतदानाचा अधिकार होता. पण तृतीयपंथी म्हणून नाही तर स्त्री किंवा पुरूष म्हणूनच होता. म्हणजे तोपर्यंत त्यांना कायद्याने त्यांची हवी ती ओळख निवडण्याचा अधिकारच नव्हता. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला समाजातच नाही तर कायद्यातही मान्यता नव्हती. म्हणजे ” तृतीयपंथी ” या त्यांच्या अस्तित्वाला पुर्णपणे नाकारल जात होतं. म्हणजे 21 व्या शतकाच्या विज्ञानाच्या जगात तृतीयपंथी समाजाला ही वागणूक. समाजात कायद्यासाठी सुद्धा स्त्री आणि पुरूष फक्त हे दोनच गट अस्तित्वात होते. हे माझ्यासाठी भयंकर असं काहीतरी होतं. मी आपल्या देशाचा तिरंगा पाहून त्यालाही प्रश्न केला की, “तू स्वतंत्र झालास रे, पण इथली सगळी माणसं स्वतंत्र झालीत का ???? ”

2014 च्या त्या नव्या कायद्याने तृतीयपंथीयांना पहिल्यांदा एक स्वतंत्र अस्तित्वाची व्यक्ती म्हणून आहे असं स्वीकारलं होतं.

मग त्यानंतर मी त्यांच्याबद्दल माहिती काढायला सुरूवात केली. गुगलवर, पुस्तकं असं करून मी बऱ्यापैकी त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. तेव्हा मला त्यांच्या शारिरीक, मानसिक रचेनेची माहिची मिळाली. तेव्हा मला कळलं की ते पैसे का मागतात! त्यांच्या आयुष्यात किती अंधार आहे याची जाणीव झाली.

सर्वात मोठ दु:ख तर हे असतं की, “आपण नक्की स्त्री आहोत की पुरूष आहोत”. कारण शरीर आणि मनाचा मेळच नसतो. समाज ज्या रूपाला प्रतिष्ठा आणि मान्यता देतो ते त्यांना नको असतं. तर त्यांना जे रूप हवंय त्याला हा समाज प्रतिष्ठा आणि मान्यता देत नाही. त्यामुळे शरीर नावाच्या पिजऱ्यांत अडकलेल्या मनाला कसं मुक्त करायचं हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत वेदनादायी प्रश्नं. त्यामुळे अनेक जण तर घरातून पळूनच जातात. कारण बऱ्याचदा जन्मदात्यांनाही त्यांच असं असणं मान्य नसतं. खरंतर कुठेतरी जन्मदात्यांचीही होरपळ होतेच म्हणा. घर सोडल्याने आलेला मानसिक एकटेपणा, नैराश्य, शिक्षणाचा अभाव, अनेक व्यसनं, स्वत:च्या लैंगिक समस्या, त्यात जगण्यासाठी मागावी लागणारी भीक आणि करावा लागणारा वेश्या व्यवसाय, बलात्कार, त्यातून झालेले लैंगिक आजार, HIV चं मोठं प्रमाण, सतत धिक्कारणारा समाज, इतकं सगळं किंवा याहीपेक्षा जास्त.

तरी आता कायद्याने साथ दिल्यामुळे तृतीयपंथी समाजातून काहीजण शिकून पुढे येत आहेत. समाजाची नविन पिढी आता थोड्याफार प्रमाणात का होईना तृतीयपंथीयांना समाजाचा महत्वाचा भाग मानू लागलीये. त्यांना आदर देऊ लागलीये.

आपण सगळ्यांनीच त्यांना स्वीकारनं गरजेचे आहे. रस्त्याने जाताना त्यांच्यावर हसणं किंवा त्यांची किव करणं किंवा त्यांच्याकडं ते कोणी तरी वेगळेच आहेत असं समजून टक लावून बघणं बंद करायला हवं. आपण त्यांच्याबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलणं आणि त्यांना सामान्य माणूस म्हणून स्विकारणं गरजेचे आहे. त्यामुळे तेही आपल्यासोबत जगण्याच्या या प्रवाहात येतील. समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीचा एक भाग होतील. आईवडीलांनी ही आपल्या मुलांना लहानपणापासूनच त्यांचा आदर करायला शिकवावं, त्यांना सामान्य माणूस म्हणून स्वीकारायला शिकवावं.

कारण निसर्गातल्या प्रत्येक जीवाचं अस्तित्वं हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं आणि निर्सगासाठी सुद्धा. प्रत्येक जीवाला त्याच्या जन्माचा एक सुंदर सोहळा साजरा करायचा असतो. मग ते झाडं , झुडूपं , प्राणी, पक्षी असतील किंवा स्त्री , पुरूष आणि तृतीयपंथी असतील.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.