Categories: गावगाडा

चिमण्या मारल्या मुळे ४.५ कोटी जनता उपासमारीने मेली होती

आपण लहानपणापासून चिमण्या पाहत आलोय. शाळेत शिकताना शाळेच्या कौलात चिमण्यांची घरटी कायम दिसायची. पण मागच्या काही वर्षात चिमण्या दिसणे बंद झाले आहे. पण याचा आपल्याला काही विशेष फरक पडला नाही.

पण कधी विचार केला आहे का ? चिमण्या नष्ट झाल्याच्या माणसाच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. 

चिमण्या नष्ट केल्याने चीनमधील ४.५ कोटी जनता उपासमारीने मेली होती. कदाचित हे अशक्य वाटत असेल, पण हा खरा प्रसंग आहे.

हा प्रसंग आहे चीनमधला आणि १९५० च्या दशकातला.

तसं पाहायला गेलं तर चिमणी सर्वभक्षक आहे. चिमणी बहुतेक प्रकारची धान्य तर खातेच पण सोबत कीटक, अळ्या, नाकतोडे, कोळी इत्यादी देखील तिचे खाद्य असते. शेतात पिक कणसे धरू लागली की चिमण्यांचे थवे कोवळे दाणे फस्त करून धान्याची नासाडी करतात. त्यामुळे चिमणी उपद्रवी आहे असे वाटू शकते.

म्हणून चीनमध्ये यावर उपाय शोधला तो उपाय म्हणजे चिमण्या मारण्याचा.

चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष माओ झेडोंग या संपूर्ण नाट्याचे सूत्रधार होते. झेडोंग जेव्हा सत्तेवर आला तेव्हा चीन जागतिक क्रमवारीत खालच्या स्थानावर होता. पण झेडोंग महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते. चीनला अमेरिका आणि ब्रिटन या प्रगत राष्ट्राशी बरोबरी केवळ १५ वर्षांत करण्याची माओची महत्त्वाकांक्षा होती.

याच महत्त्वाकांक्षेतून १९५०च्या दशकाच्या शेवटाला “द ग्रेट लिप फॉरवर्ड” नावाच्या राष्ट्रीय मोहिमेचा उदय झाला.

१९५०-६० च्या दशकात चीनदेखील शेतीप्रधान देश होता. प्रचंड लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि शेती याच्या जोरावर आर्थिक क्रांतीचे उद्दीष्ट लवकरात लवकर गाठायचेच या ध्येयाने माओ पछाडला होता.

“द ग्रेट लिप फॉरवर्ड” मोहिमेच्या केंद्रस्थानी कारखाने व शेती व्यवसाय होता. परंपरागत पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर महासत्ता बनण्यास अधिक काळ लोटला असता. त्यासाठी त्यांनी ५० ते काही ठिकाणी दोन हजार लोकांचा गट बनवत नियोजनबद्ध रीतीने शेतीचा कार्यक्रम हाती घेण्यात निर्णय घेतला.

तेव्हा काही गटांनी एकरी १० हजार किलो उत्पन्नाच्या असाध्य घोषणा केल्या. आपल्या आर्थिक क्रांतीचा हेतू सफल होत असल्याचा माओला आनंद होत होता.

पण त्यावेळी चिमण्या या आपल्या ध्येयात बाधा आणू शकतात, असं झेडांगला वाटू लागले. एक चिमणी सरासरी ४.५ किलो दाणे खाते, म्हणजेच कोट्यवधी चिमण्या आपल्या शेतीमालाचे अगणित नुकसान करतील या विचाराने माओ प्रचंड अस्वस्थ झाला.

त्यावर उपाय म्हणून झेडांगने “चिमण्या मारा” मोहिमेची जाहीर घोषणा केली. राष्ट्रीय स्तरावर योजनेच्या कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले.

जास्तीत जास्त चिमण्या मारणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केली गेली.

संपूर्ण चीनभर चिमण्या मारण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. लाठ्या-काठ्या, दगड, बेचक्या, बंदुकांचा वापर चिमण्या मारण्यासाठी केला गेला. त्यांना मारण्यासाठी ढोल, थाळ्या, जोरजोरात बडविल्या जात असत. त्याच वेळी काही लोक उंच काठ्यांवर कपडा लावून चिमण्यांना झाडांवर बसण्यापासून रोखत असत.

त्यामुळे हवेत उडून उडून थकल्यावर शेवटी जमिनीवर पडून त्यांचा जीव जात असे. अशा प्रकारे कोट्यवधी चिमण्यांबरोबरच इतरही पक्ष्यांचा संहार करण्यात आला.

चिमण्या या देशाच्या प्रगतीआड येणाऱ्या शत्रू असल्याने त्यांना मारून राष्ट्रहिताचे कार्य आपण केले आहे. हे सामान्य जनतेच्या मनात बिंबविण्यात माओचे साम्यवादी प्रशासन यशस्वी झाले होते.

पण “चिमण्या मारो” मोहिमेनंतर दोन वर्षे शेतीच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ न झाल्याने माओ नाराज झाला. त्यात १९६० साली चीनमध्ये प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले.

संपूर्ण चीनमध्ये उभ्या पिकांवर टोळधाडीचे सत्र सुरू झाले. पण टोळांना खायला नैसर्गिक शत्रू चिमणीच शिल्लक नसल्याने अपार कष्टाने पिकविलेल्या फळबागा, भाजीपाला, धान्याची शेती टोळांनी फस्त केली.

तत्कालीन उपलब्ध सरकारी कागदपत्रांनुसार ६०% शेती या काळात उद्ध्वस्त झाली होती. तर सुमारे १.५ कोटी लोक उपासमारीने मेले, असे सांगण्यात येते. परंतु काही इतिहासकार आणि शोधकर्त्यांच्या मते किमान ४.५ कोटी लोक या दरम्यान मृत्युमुखी पडले होते.

फ्रँक डिकोटर या इतिहासकाराच्या मते एकट्या शांघाय प्रांतामध्ये एका महिन्याभरात १३ लाख ६७ हजार चिमण्या मारल्या गेल्या होत्या. यावरून विचार करा, संपूर्ण चीनमध्ये दोन वर्षांच्या कालवधीमध्ये किती चिमण्या मारल्या गेल्या असाव्या.

पण निसर्गचक्र बिघडल्याने चीनमधील सामान्य नागरिक भूकेने तडफडून मेले.

असं सांगण्यात येते, तेव्हा अन्न तुटवडा एवढा भीषण होता की भूक शमविण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने लोकांनी शेतातला चिखल खाल्ला.

तर शेवटी सांगायचा मुद्दा, चिमण्या फक्त दाणे खात नाहीत तर त्या पिकांचे कीटकांपासून रक्षणाचे महत्वाचे कार्य करतात हे माओला समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर उपाय म्हणून चीनने सोविएत राष्ट्रसंघाकडून चिमण्या आयात केल्या, त्या वाढवल्या आणि त्यानंतर पुढच्या काळात हे निसर्गचक्र हळुहळू सुरळीत झाले.

या सगळ्यात समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे निसर्गाच्या चक्रामध्ये खूप जास्त हस्तक्षेप झाला कि त्याची किंमत मोजावी लागते. त्याचीच किंमत चिनी नागरिकांना मोजावी लागली होती.

चिमणी ही आपल्या घराच्या आसपास आढळणाऱ्या पक्ष्यांचे प्रातिनिधिक रूप आहे, चिमणी वाचली तर आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या जैवविविधतेचे जतन होईल. हे चिमणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २० मार्चला “जागतिक चिमणी दिन” साजरा केला जातो.

Pravin Kale

प्रविण काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून त्यांनतर दिल्ली येथून भारतीय जन संचार संस्थान दिल्ली (IIMC) येथून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.