Take a fresh look at your lifestyle.

पाच निवडणुकामध्ये पराभव; पण थेट विधानपरिषद !

सध्या भाजप मधून आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून

0

मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात एक नाव सतत चर्चेत येत आहे. ते नाव म्हणजे गोपीचंद पडळकर.

सध्या ते एका नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे बैलगाडा शर्यत. आपल्या गावात त्यांनी बैलगाडा शर्यत भरवण्याची घोषणा केली. प्रशासनाने त्यावर बंदी घालून कार्यकम न होवू देण्याचा प्रयत्न केला.

पण ऐकतील ते पडळकर कसले. त्यांनी रात्रीत नवीन ठिकाणी जागा करून शर्यत पार पाडलीच. एकंदरीत गोपीचंद पडळकर यांनी राजकारणात आपल्या नव्या कार्यपद्धती दाखवण्यास सुरुवात केली आहे. पण पडळकर यांचा राजकीय प्रवास देखील असाच आहे.

राजकारणाची सुरुवात

सध्या भाजप मधून आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून केली.

२००९ साली युती आणि आघाडीला पर्याय म्हणून रिडालोस (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) स्थापन झाली होती. त्यावेळी त्या आघाडीचे नेतृत्व रामदास आठवले, भाई जयंत पाटील, महादेव जानकर हे नेते करत होते.

२००९ च्या या रिडलोसच्या प्रयोगात सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाली होती. त्या जागेवर गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदा विधानसभा लढवली.

त्यामध्ये त्यांचा पराभव झाला मात्र या निवडणुकीत गोपीचंद पडळकर हा चेहरा राजकीय वर्तुळात लढाऊ म्हणून चर्चेत आला.

त्यानंतर पडळकर यांनी करगणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांची लढत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्याशी होती. पण जिल्हा परीषद च्या निवडणुकीतही त्याना विजयापर्यंत जाता आले नाही.

भाजपात प्रवेश आणि नाराजीनामा

२०१४ साली देशात भाजपची लाट होती. यावेळी पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल बाबर यांचा विजय झाला. पण राज्यात भाजपचे सरकार आले, त्याही वेळी पडळकर यांना विधानपरिषद दिली जाणार अशी चर्चा होती. पण त्यावेळी त्यांना ती मिळाली नाही.

या काळात भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांचे आणि पडळकर यांचे मतभेद झाले. यामुळे पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांवर टिका करत भाजपचा राजीनामा दिला.

२०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचे जाहीर केले. पण ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली.

भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत झाली. कोणाचा विजय होईल हे सांगता येत नव्हते एवढी तुल्यबळ लढत झाली.

पण या लढतीत गोपीचंद पडळकर तिसऱ्या क्रमांकावर गेले तरी त्यांना 3 लाख पाच हजार मते मिळाली. त्यामुळे राज्यभर पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा झाली.

पुन्हा भाजपात

२०१९ ची लोकसभा वंचित आघाडीकडून लढली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशा दिवशीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांची बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

विधानसभा निवडणुकीत पडळकर यांनी बारामतीत अजित पवार यांच्याशी लढत दिली मात्र या लढतीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

असं म्हटलं गेल कि बारामती मध्ये विधानसभा लढताना पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन दिले होते. पुढे ते आश्वासन पाळले गेले. गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधानपरिषदेवर आमदार केले.

पण आजवरच्या राजकीत वाटचालीत एक जिल्हा परिषद, तीन विधानसभा, एक लोकसभा असे एकूण पाच पराभव त्यांनी स्वीकारले. 

सध्या गोपीचंद पडळकर राज्यात आपली आक्रमक प्रतिमा निर्माण करताना दिसत आहेत. थेट शरद पवार यांना टार्गेट करून ते स्वतःला सिद्ध देखील करत आहेत. 

बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.