संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आचार्य अत्रेंनी “मराठा” सुरु केले होते

मराठी भाषेत आचार्य अत्रेंचे विनोद माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. कवी, विडंबनकार, प्रस्तावनाकार, चित्रपटकार, नाटककार, वक्ते, राजकारणी, आमदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार अश्या सर्वच क्षेत्रात आचार्य अत्रेंनी मराठी भाषेला समृद्ध केली.

पण आचार्य अत्रेंच्या जीवनाचे सार्थक करणारा मोठा लढा संयुक्त महाराष्ट्र हाच होता आणि त्या लढयाची मुख्य समशेर दैनिक मराठा हीच होती.

स्वातंत्र्यानंतर देशात भाषावर प्रांतरचना केल्यानंतर देशातल्या अनेक प्रांतांना त्यांच्या भाषेचे राज्य मिळाले. पण महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मात्र स्वतंत्र राज्य नाकारण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्राचे द्विभाषिक अस्तित्वात आले.

पण याच्या विरोधात मराठी जनतेने उग्र अवतार धारण करून या अन्यायाविरुद्ध जेव्हा रस्त्यावर उतरून आवाज उठवला. तेव्हा त्यावेळच्या मोरारजी सरकारने १०६ जणांचे बळी घेतले, आठ हजार माणसे जखमी झाली, काही पांगळी झाली.

त्या वेळी मुंबईची सगळी वृत्तपत्रे मराठी माणसाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होती.

मुंबईतून प्रसिद्ध होणारे नवाकाळ आणि पुण्याच्या वालचंद कोठारी यांचे दैनिक प्रभात सोडून इतर वर्तमानपत्रांनी मराठी माणसाचा आवाज पूर्णपणे चेपून टाकण्यात आला होता. आचार्य अत्रे तेव्हा साप्ताहिक नवयुग चालवायचे. आचार्य अत्रे यांनी नवयुगच्या माध्यमातून हा लढा आपल्या खांद्यावर घेतला. तेव्हा नवयुगचा खप लाखांच्या पुढे गेला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी १२ मे १९५६ च्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होती. या सभेत सेनापती बापट म्हणाले की, ‘अत्रेसाहेब मराठी माणसाच्या या महान लढयासाठी साप्ताहिक नवयुग कमी पडत आहे, आता दैनिकाची गरज आहे. मराठी माणसाचा आवाज यात उठेल असं दैनिक हवं आहे.’

अत्रे साहेब भाषणाला उठले आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढयासाठी अवघ्या सहा महिन्यांनी १५ नोव्हेंबर १९५६ पासून दैनिक मराठा सुरू होईल.

ऑफिस नाही, संपादकीत विभाग नाही, रजिस्ट्रेशन नाही म्हणजे कोणतीही तयारी नसताना आचार्य अत्रेंनी दैनिकाची घोषणा करूनही टाकली. सभेच्या शेवटी मराठाच्या मदतीसाठी थाळी फिरली आणि त्या थाळीमध्ये प्रचंड रक्कम जमा झाली. यातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र झाला.

विरोधकांच्या पोटात गोळा येईल इतके जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीने उभे केले. त्याचे खरे सेनापती आचार्य अत्रेच असे होते. तसेच अत्रेसाहेबांचा मराठासुद्धा होता.

मराठामधील बातमीच्या शीर्षकाने सरकारला धारेवर धरले. मराठा काय म्हणतो, अत्रे मराठा मधून काय लिहितात ? यासाठी या दैनिकावर उडया पडल्या. मराठाने इतिहास घडवला. १९५६ ते १९६० या चार वर्षातील दैनिक मराठा ३६५ दिवसातले अंक म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रूच्या विरोधात धडाडणारा तोफखाना होता.

अत्रेसाहेबांच्या एका एका शीर्षकाने समितीच्या चळवळीला बळ मिळत होते. १९५७च्या विधानसभा निवडणुकीत कराड मतदार संघात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण निवडून येतात की हरतात याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष्य वेधले होते. यशवंतरावांच्या विरोधातील शेकापक्षाचे उमेदवार केशवराव पवार हे अवघ्या ७०० मतांनी पराभूत झाले. दुस-या दिवशीचे दैनिक मराठाचे शीर्षक होते, ‘तानाजी पडला तरी, संयुक्त महाराष्ट्राची सिंहगड समिती जिंकणारच

त्यानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्रात पराक्रम केला. मुंबई, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी अशा सर्व जिल्ह्यांतून काँग्रेसचे फक्त ५ उमेदवार निवडून आले. मुंबई महापालिका निवडणूक समितीने जिंकली आणि आचार्य मो. वा. दोंदे पहिले महापौर झाले.

निवडणूक प्रचारात अत्रेसाहेब महाराष्ट्रभर फिरत होते. आणि मराठाची शीर्षके चावडी चावडीवर सामुदायिक वाचनाने वातावरण तयार करीत होती. जालन्याला अंकुशराव घारे यांच्या प्रचाराची सभा झाली. मराठाचे शीर्षक होते. ‘जालना-जालना, काँग्रेसवाल्याने, आता तरी जाल-ना’ बारामतीला सभा झाली. साहेबांचे शीर्षक होते. बारामती-बारामती सारे व्हा एकमती, काँग्रेसला चारा माती.

निवडणुकीचा निकाल लागला. ११ ठिकाणी काँग्रेसचा बो-या वाजला. आचार्य अत्रेंनी मराठात मुख्य शीर्षक दिले ‘अल्याड नेहरू, पल्याड ढेबर, मध्ये बसला मो-या महाराष्ट्रात वाजला काँग्रेसचा बो-या’ असे एक नव्हे तर अनेक शीर्षकांनी दैनिक मराठातून अशा अनेक प्रकरणांना अत्रे साहेबांनी वाचा फोडली आणि महाराष्ट्रभर मराठी माणसांचा आवाज गर्जत राहिला.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या दिवशीच्या दैनिक मराठामध्ये “हुतात्म्याच्या अश्रृंनी महाराष्ट्रावर अभिषेक” असे मुख्य शीर्षक होते.

संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आचार्य अत्रे यांनी साहित्याच्या रसाळ मेजवानीचे कितीतरी अग्रलेख मराठी वाचकांना वाचायला दिले. माझा बाबू गेला, आजची आषाढी, आषाढस्य प्रथम दिवसे, यंत्रमहर्षी महात्मा मेस्त्री, आम्ही जिंकलो, आम्ही हरलो, गानकोकिळा लता, अधू मेंदूचा मधू (मधू लिमये), फडक्यांच्या चिंध्या अशा अनेक अग़्रलेखांनी अग्रलेखाला किती मोठया प्रमाणात वाचक असतो हे दैनिक मराठानेच दाखवून दिले.

Pravin Kale

प्रविण काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून त्यांनतर दिल्ली येथून भारतीय जन संचार संस्थान दिल्ली (IIMC) येथून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.