Categories: Uncategorised

उद्योजगता, राजकारण आणि तरुणाई – रोहित पवार यांची मुलाखत.

जन्माने मिळालेला प्रचंड मोठा वारसा असताना देखील उद्योगात स्वताच्या नावाचा ठसा उमठविल्या नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय जीवनात प्रवेश करतानाच सृजन च्या माध्यमातून तरुणांना दिशा देण्याचा केलेला प्रयत्न.. अशा सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात एक तरूण म्हणून वावरतानाचा प्रवास उलघडत जाणारी मा. रोहित पवार यांची विशेष मुलाखत.

  • तुम्हाला राजकारण आणि उद्योग दोन्हीचा समृद्ध वारसा आहे. तुम्ही सुरुवातीला उद्योगाकडे आकर्षित झालात, तिकडे जम बसवला तरी राजकारणाकडे आकर्षित होण्या मागचं नेमकं कारण काय?

त्याच असं झालं कि उद्योग क्षेत्रात असताना आपल्याला, आपल्या बरोबरच लोकांसाठी देखील काम करावं लागतं. आज माझ्याकडे २२०० लोक काम करतात. आपल्या उद्योगावर ते आणि त्यांची कुटुंबं म्हणजे जवळपास ८००० लोक अवलंबून आहेत. आणि मला नेहमीच वाटतं कि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला  फायदा व्हावा. पैसा कमावणे, तो गुंतवणे या बाबी चालतच राहतात पण लोकांना आपल्याकडून जास्तीत जास्त मदत व्हावी. लोकांच्या जास्तीत जास्त उपयोगी पडावं असं मला वाटत होत. यासाठी चांगला पर्याय म्हणजे व्यवस्थेच्या बाहेर राहून काम करण्यापेक्षा व्यवस्थेत राहून काम करणं. म्हणून मग मी राजकारणाकडे वळलो.

  • तुम्ही यशस्वी उद्योजक आहात, आता तुम्ही राजकारणात आहात याशिवाय तुम्ही सर्वच चळवळींच्या मंचावर दिसता हे कसं जमवता ?

तुम्हाला सांगतो, मला लहान असताना मासे पकडायला आवडायचं, एके दिवशी मासे पकडत असताना मी विहिरीत पडलो. बाजूला असणाऱ्या ट्रॅक्टर ड्राययव्हरने मला बाहेर काढले आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या बाबांनी मला कमरेला दोरी बांधून विहिरीत ढकललं. तसं सध्या दोरी बांधून राजकारणातलं प्रशिक्षण चालू आहे. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. राजकीय व्यासपीठ स्वतः कमवावं लागतं पण आजवर उद्योग व्यवसायात जे काय कमावल जे काही अनुभव आले ते शेअर करायला मला लोक बोलवतात. मी देखील अशा व्यासपीठावर जात असतो आणि दुसरं असं कि पवारसाहेब घरातल्या कुणालाही सोपं काम देत नाहीत. ते प्रत्येकाला कमवायला सांगतात तसं सध्या मी लोकांचा विश्वास संपादन करतोय. त्यासाठी  सध्या राजकीय सोडून इतर व्यासपीठावर जास्त असतो. मला लोकांकडे जावून वेगवेगळे विषय समजून घ्यायला आवडते.

  • तुम्ही सध्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचा जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल सध्या बरीच सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे, त्याबद्दल काय सांगाल ?

लोक मला विचारतात, तुम्ही जिल्हा परिषद शाळांवर एवढा प्रयत्न करताय तुमच्या मुलाला तुम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकायला पाठवाल का? मी म्हणतो कि नाही पाठवणार. पण जरी पाठवणार नसलो तरी माझ्या मुलांच्या शाळे इतकीच प्रगत जिल्हा परिषदेची शाळा व्हावी यासाठी नक्की प्रयत्न करेन. आज जरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वर्ग मतदार  नसला तरी फक्त मतदानाचा विचार करून काम करून चालणार नाहीत. देशाच्या भविष्याचा विचार करावा लागेल. अजूनही या प्रकल्पावर काम चालू आहे. विविध कंपन्यांशी मदतीसाठी बोलणं चालू आहे.

  • पवार साहेबांचा नातू असण्याचे नेमके काय फायदे तोटे आहेत?

एवढ्या मोठ्या नावाचा वारसा तुम्हाला असेल तर तुमच्या स्वभावाला निश्चितच दिशा मिळते तो एक मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे कि तुम्ही जर त्यांच्या विचारांवर चालणार असाल तर लोक लगेच साथ देतात. फक्त त्यांचं नाव वापरलेलं चालत नाही. नुसता आडनावाचा फायदा होत नाही. त्यासाठी साहेबांचे विचार आत्मसात करून त्यासोबत कष्ट आणि काम सुद्धा करावे लागते.

  • पवार साहेबांचा नातू म्हणून त्यांच्या तोडीच कर्तुत्व दाखवण्याच्या अपेक्षांचं ओझं वाटतं का?

साहेबांकडे आम्ही एक मार्गदर्शक म्हणून बघतो त्यामुळे त्यांच्याशी आमची स्पर्धा कधीच नाही. समाजाची तशी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही. कारण ज्या तत्वांवर पवारसाहेब चालले त्याच तत्वांवर आम्हीदेखील चालावं अशी समाजाची माफक अपेक्षा असते. उलट पवार साहेबांपेक्षा कोणी काही मोठं करेल यावर माझा विश्वास बसत नाही व  समाजाचासुद्धा विश्वास बसणार नाही. एवढं साहेबांचं काम मोठं आहे. साहेब एक नुसती व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. तो त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण केला आहे. तो विचार  नेहमीच मार्गदर्शन करणारा आहे.

  • आजकाल प्रत्येक पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत असतो तुमच्यावरही तो झाला असेल त्याबद्दल काय सांगाल ?

सगळ्यात अवघड निवडणूक कुठली असेल तर ती ग्रामपंचायतीची. पण मी जिल्हा परिषदेपासून सुरवात केली आणि घराणेशाहीच्या माध्यमातून मी आलो असतो तर थेट आमदार, खासदार म्हणून आलो असतो. पण ते नाकारून राजकारणाच्या एकदम सुरुवातीच्या पायरीपासून मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. म्हणून यात काही फार तथ्य नाही. असा कुठलाही आरोप माझ्यावर झालेला नाही. एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. युवकांना, सर्वसामान्य लोकांना बरोबर घेवून त्यांना सदैव मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो.

  • राजकारण, समाजसेवा आणि उद्योग या सर्व आघाड्यांवर काम करताना कुटुंबाला कसा वेळ देता ?

आता देखील माझी तब्येत फारशी बरी नाहीये, पण तरीदेखील मी तुमच्याबरोबर आहेच. एवढा त्याग तर करावाच लागतो. एखाद्या विषयात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल म्हणजे त्या विषयाची व्याप्ती वाढवायची असेल तर एवढा त्याग करावाच लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि तुमच्या आजूबाजूला विश्वास टाकण्यायोग्य लोक पाहिजेत जे सोपवलेलं काम ते जबाबदारीने पार पाडतील. आणि कुटुंबाची गोष्ट असेल तर मी शक्य तेवढा वेळ कुटुंबाला द्यायचा प्रयत्न करतो कारण  माझ्या मुलांचं बालपण हे परत येणार नाही आणि याबाबतीत मला परत पश्चाताप करायला आवडणार नाही.

  • समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं काम चालू आहे. हे काम करत असताना असा एखादा सुवर्णक्षण किंवा ज्याला तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळालीय, अशी कोणती आठवण सांगू शकाल का?

बारामतीच्या एक महिला आहेत. त्यांच्या पतीच निधन झालंय आणि त्यांच्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना आपण आपल्या सृजन उद्योजकता व कौशल्य विकास याच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करून दिलेला असून तो व्यवसाय आज चांगल्या पद्धतीने सुरु असून त्यातून ते आज चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवतात. त्या माझ्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा माझा त्यांना काहीतरी उपयोग झाला याचं मला समाधान आहे. हे करत असताना मी फक्त एवढंच केलं कि बाकीची स्वावलंबनातून पुढं गेलेली उदाहरण त्यांच्या पुढं ठेवली. त्यातून त्यांना जाणीव झाली कि बाकी लोक हे करू शकत असतील तर आपणही कुठे कमी नाहीये हि जाणीव त्यांना पुढे घेऊन गेली. सृजन उद्योजकता व कौशल्य विकासच्या माध्यमातून अशी जवळ जवळ ९२ जणांनी स्वतःचा व्यवसाय चालू केल्याचं सांगू शकतो.

  • दादा, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करताय ते काम आणि बाकीचे युवा नेते काय काम करत आहेत यात मुलभूत काही फरक वाटतो का?

बाकी कुणी किती आणि काय केलय, हे मी जास्त अभ्यासलं नाही पण माझ्याबाबतीत सांगायचं झालं. मी आता माझ्या हातात काय काम आहे, ते चांगले कसे होईल व त्याचा प्रत्येक घटकाला कसा फायदा होईल. याचा प्रयत्न मी नेहमी करतो. मी व माझ्या सहकाऱ्यांनी केलेले आरोग्य, युवक, शिक्षण व इतर क्षेत्रातील काम जर एकाद्या युवक किंवा युवक नेत्याला आवडले व त्यांनी त्यांच्या भागात राबवले तर त्यातून मला नवीन उर्जा मिळेल व आनंद होईल. पवार साहेब ताई आणि दादा समाजासाठी झपाटल्यासारखं काम करतायत. त्यांच्या कामाला हातभार आम्ही लावतोय.

  • तुमच्या कारकिर्दीच्या पुढच्या तीन वर्षात तुम्हाला कोणते महात्वाकांशी कार्यक्रम राबवायचे आहेत ?

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हाती घेतलाय तो पुढं न्यायचा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करायचंय. त्याशिवाय पाणीप्रश्नात जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे काम करायचंय. युवकसंगठन करून त्यांच्यातील गुणवत्तेला वाव देण्यालापण माझं प्राधान्य राहील. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून गुणवत्ता असणाऱ्या मुलांना मी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. पण हे करत असताना मी फक्त जिल्हा परिषद गटापुरतंच मर्यादित ठेवतोय अस नाही. यापुढच्या तीन वर्षात हे विषय तर हाताळायचेच आहेत पण कुणाची एखादी कल्पना आवडली कुणी काही विषय सुचवला आणि तो तेवढा महत्वाचा वाटला तरी अशा विषयांवर देखील काम करेन.

  • तुमचा साहित्यिक वर्तुळात चांगला वावर असतो मग तुम्ही स्वतः कोणतं पुस्तक लिहायचा विचार करताय का?

मी सध्या फक्त वाचन करत आहे. पुस्तक वगैरे लिहायच्या भानगडीत पडायचा काही विचार नाही. मला खऱ्या घटनांवरची पुस्तक वाचायला खूप आवडत. आत्मचरित्र देखील वाचायला आवडतात. पुस्तक वाचत असताना लेखक कोण आहे यापेक्षा पुस्तक आणि त्याचा विषय याला मी महत्व देतो. याशिवाय वर्तमानपत्रांचं संपादकीय आवर्जून वाचतो कारण ते सध्या भेडसावणाऱ्या समस्यांविषयी असते. समस्या सोडवताना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

  • आपले आजोबा पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी शेती क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे आणि तुमचे दुसरे आजोबा शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेलं आहे तर तुम्हाला दोघांपैकी कुणाचा वारसा पुढं न्यायला आवडेल?

आप्प्पासाहेबांचा वारसा सामाजिक क्षेत्रातला आहे आणि पवारसाहेबांच्या ८० टक्के सामाजिक आणि २० टक्के राजकीय क्षेत्रातला आहे दोघातला सामान दुवा म्हणजे समाजकारणाचा ८० टक्के वारसा नक्कीच पुढे चालवेन आणि राजकारण परिस्थिती व काळातून शिकेन.

  • येणाऱ्या निवडणुकांनंतर तुम्ही विधिमंडळात किंवा संसदेत असाल का?

राष्ट्रवादी पक्षाला विधिमंडळात चांगल्या ठिकाणी नेण्यासाठी जे काय करायला  लागेल ते मी करेन.

  • सृजनची पुढची दिशा काय असेल?

क्रीडा व शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम हातात घायचे आहेत. त्याचं बरोबर बेरोजगारीच्या समस्ये संदर्भात काम करण्याला प्राधान्य राहील. आणि नोकरीपेक्षा तरुणांनी उद्योगाकडे वळावं यासाठी देखील कार्यक्रम घेण्याचं नियोजन आहे.

  • मराठी माणूस उद्योगाच्या तुलनेत नोकरीकडे जास्त वळतो आणि तुम्ही तरुणांना उद्योजक बनायला सांगत आहात, तर तरुणांना उद्योगासाठी कन्व्हिन्स करायला नेमक्या कोणत्या अडचणी जाणवतात?

नोकऱ्या मिळत नाहीत हे देशातील वास्तव आहे. त्यामुळे तरुणांनी रिकामटेकड राहण्यापेक्षा उद्योग व्यवसाय करावा त्यातून आथिर्क स्थैर्य प्राप्त होईल. हे सांगण्याकडे माझा कल असतो. नोकऱ्या कमी झाल्यात हे वास्तव लोकांना माहित झालय त्यामुळे काही अडचण नाही आणि मी प्रयत्न करतो ज्यांनी आपले व्यवसाय शून्यातून निर्माण केले आहेत. त्यांनीच तिथे येवून युवकांना मार्गदर्शन केले तर युवकांना त्यांच्या अडचणी समजण्यास मदत होईल.

  • पारंबी दिवाळी अंकाच्या माध्यमातून तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?

तरुणांना एवढाच सांगेन प्रयत्न करा, पैसा नाही म्हणून खचून जावू नका. स्वतःच्या पायावर उभं रहा. पण स्वतःचा वापर करून घेवू देवू नका. एकीचा मार्ग अवलंबवा, संघटीत व्हा व आपल्या हक्कासाठी एकत्रित लढूया.

पारंबी दिवाळी अंक

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.